Published On : Mon, Oct 18th, 2021

संविधान प्रास्ताविकाचे शिलालेख ठरणार प्रेरणास्त्रोत : ना. नितीन गडकरी

Advertisement

संविधान चौकात संविधान प्रास्ताविकाच्या शिलालेखाचे लोकार्पण

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे संविधान चौकात उभारण्यात आलेल्या संविधान प्रास्ताविकेचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते रविवारी (ता.१७) मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले. माजी सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांच्या संकल्पनेतून संविधान प्रास्ताविकाच्या शिलालेखाचे निर्माण करण्यात आले आहे.

संविधान चौकात उभारण्यात आलेले संविधानाच्या प्रास्ताविकाचे शिलालेख हे संपूर्ण देशवासीयांसाठी प्रेरणास्त्रोत ठरणार आहे, असा विश्वास यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना ते म्हणाले, नागपूर महानगरपालिकेने देशाला अभिमान वाटावा असे काम केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान प्रास्ताविकेचे शिलालेख उभारण्यात आले आहे, हा सुवर्णयोग आहे. काही वर्षांपूर्वी नागपूरच्या अधिका-यांनी माझी भेट घेउन प्रत्येक कार्यालयात संविधानाची प्रास्ताविका लावणे आणि वाचन करण्याचा आग्रह केला होता. यानंतर संदीप जाधव यांनी पुढाकार घेउन संविधान चौकामध्ये संविधानाच्या प्रास्ताविकाचे शिलालेख उभारण्याची संकल्पना मांडली व ती पूर्ण सुद्धा केली. त्यांच्या या पुढाकाराने नागपूर शहराचे नाव राष्ट्रीय पातळीवर लौकीक झाले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल ना. गडकरी यांनी संदीप जाधव यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी मंचावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, खासदार पद्मश्री डॉ.विकास महात्मे, आमदार विकास कुंभारे, मनपा सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, केंद्र सरकारच्या खादी ग्रामोद्योग आयोगाचे सदस्य जयप्रकाश गुप्ता, अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, बसपा गटनेता जितेंद्र घोडेस्वार, माजी आमदार प्रा.अनिल सोले, डॉ.मिलींद माने, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, ज्येष्ठ नगरसेवक तथा नासुप्रचे विश्वस्त संजय बंगाले, नगरसेविका रुपा राय, उज्ज्वला शर्मा, प्रगती पाटील, ज्येष्ठ नगरसेवक संदीप जाधव, आरोग्य समिती उपसभापती विक्रम ग्वालबंशी, माजी महापौर मायाताई इवनाते, धंतोली झोन सभापती वंदना भगत, नगरसेवक सर्वश्री किशोर वानखेडे, किशोर जिचकार, अभय गोटेकर, ॲड.धर्मपाल मेश्राम, नागेश सहारे, निशांत गांधी, अमर बागडे, माजी उपमहापौर मनीषा कोठे, नगरसेविका निरंजना पाटील, उपायुक्त विजय देशमुख, उपायुक्त रवींद्र भेलावे, अधीक्षक अभियंता अजय पोहेकर, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, कार्यकारी अभियंता अनील गेडाम आदी उपस्थित होते.

उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रारंभी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान देऊन सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार प्राप्त करून दिला आहे. संपूर्ण देशात उद्देशिकाचे वाचन मोठ्या उत्साहाने केले जात आहे. संदीप जाधव यांच्या संकल्पनेतून प्रास्ताविकाचे शिलालेख उभारण्यात आले असून त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी याप्रसंगी सांगितले की, संविधान चौकामध्ये संविधानाच्या प्रास्ताविकाचे शिलालेख उभारण्याचा निर्णय संदीप जाधव यांनी घेतला होता. त्यांच्या संकल्पनेला सगळयांनी साथ दिली. या शिलालेखाच्या सेंड स्टोन कामावर १० लाख रुपये आणि विद्युतीकरणावर १२ लाख रुपय खर्च करण्यात आले आहे. संविधान चौकाचे नाव आता संपूर्ण देशात गौरवाने घेतले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या संकल्पनेसाठी संदीप जाधव यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि दयाशंकर तिवारी यांनी भरभरून कौतुक करीत त्यांचा विशेष सत्कार केला.

संविधान चौकातील प्रास्ताविकाच्या शिलालेखाचे डिझाईन आणि बांधकाम करणारे आर्किटेक्ट उदय गजभिये व कंत्राटदार आसीफ परवेज खान यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.