नागपूर : शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने वाहतूक विभागातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी स्वागत लॉन येथे एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दुपारी 2 ते 3 या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमात उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण आणि रात्री कर्तव्य बजावताना सुरक्षितता यावर भर देण्यात आला.
या उपक्रमाचा शुभारंभ नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते झाला. यावेळी वाहतूक पोलिसांना होमिओपॅथीचे ‘सनकेअर’ औषध आणि रात्रीच्या अंधारात दृश्यता वाढवणारी ‘शोल्डर रिफ्लेक्टर’ उपकरणे वितरित करण्यात आली. एकूण 550 वाहतूक पोलिसांना हे औषध व उपकरणे देण्यात आली.
डॉ. सिंगल यांनी यावेळी सांगितले की, वाहतूक पोलिसांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. ते कडक उन्हात आणि रात्रीच्या अंधारातही आपले कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे.
या उपक्रमाची संकल्पना डॉ. अनिल सुदामे यांच्या पुढाकाराने साकार झाली असून, मैत्री परिवार संस्थेचे सचिव श्री. प्रमोद पेंडके आणि त्यांच्या टीमने उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
या प्रसंगी सहपोलीस आयुक्त निसार तांबोळी, अतिरीक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संजय पाटील, वाहतूक पोलीस उप आयुक्त अर्चित चांडक यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
उन्हाळ्यात होणाऱ्या उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर ‘सनकेअर’ औषधाचे वितरण वेळेवरचे पाऊल ठरले आहे. तसेच ‘शोल्डर रिफ्लेक्टर’मुळे वाहतूक नियंत्रकांची रात्रीच्या वेळेस सुरक्षितता सुनिश्चित होणार आहे.
पोलीस उप आयुक्त अर्चित चांडक यांनी सांगितले की, पोलिसांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी असे उपक्रम सातत्याने राबवले जाणार आहेत.या उपक्रमामुळे वाहतूक पोलिसांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांचे मनोबल अधिक उंचावले आहे. नागपूर पोलीस आयुक्तालयाचा हा उपक्रम राज्यातील इतर पोलीस दलांसाठीही आदर्श ठरणार आहे.