Published On : Wed, Aug 14th, 2019

‘इनोव्हेशन पर्व’मुळे शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणार : महापौर नंदा जिचकार

मानकापूर स्टेडियम येथे घेतला पूर्वतयारीचा आढावा

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने येत्या २३ व २४ ऑगस्टला आयोजित ‘इनोव्हेशन पर्व’ हे विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना बळ देणारे व्यासपीठ आहे. हे व्यासपीठ शहराच्या लौकीकात भर घालणारे आहे. ‘इनोव्हेशन पर्व’च्या आयोजनामुळे नागपूर शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच उंचावेल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.

येत्या २३ व २४ ऑगस्टला मानकापूर स्टेडियम येथे होणा-या ‘इनोव्हेशन पर्व’च्या आयोजनाच्या पूर्वतयारीचा बुधवारी (ता.१४) महापौर नंदा जिचकार यांनी आढावा घेतला. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, सहायक आयुक्त महेश धामेचा, हरीश राऊत, क्रीडा संकुलचे सुभाष रेवतकर, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, कार्यकारी अभियंता (विद्युत) ए.एस. मानकर, विद्युत तांत्रिक सल्लागार संजय जयस्वाल, गिरीश वासनिक, मनोज गणवीर, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे, स्वच्छ भारतचे नोडल अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे मुख्य कन्वेनर डॉ. प्रशांत कडू, इनोव्हेशन पर्वचे मुख्य समन्वयक केतन मोहितकर, प्रभारी जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी आदी उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार यांनी संपूर्ण कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. मुख्य सभामंडप, पार्कींगची जागा, उपहारगृह, नोंदणीकक्ष, स्वच्छतागृह, मुख्य अतिथींची येण्याजाण्याची, राहण्याची व्यवस्था याबाबत त्यांनी आढावा घेतला. निर्धारित केलेली सर्व कामे वेळपर्यंत पूर्ण झाली पाहिजे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. स्टेडिअम मधल्या कुठल्याही क्रीडा साहित्याला इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनादेखील केल्या.

यानंतर महापौर नंदा जिचकार कार्यक्रमासंदर्भातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. ज्या अधिकाऱ्यांकडे जी जबाबदारी आहे, त्याची काय तयारी आहे, याचा आढावा घेतला. संपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.