Published On : Sat, Aug 12th, 2017

शिवसेनेच्या ‘डॅमेज कंट्रोल’साठी उद्योग मंत्र्यांच्या राजीनाम्याचे नाटक!: विखे पाटील

Advertisement

File Pic


मुंबई:
सततच्या दुटप्पी भूमिकेमुळे जनमानसात शिवसेनेची प्रतिमा मलिन झाली असून, ‘डॅमेज कंट्रोल’साठी शिवसेनेने उद्योग मंत्र्यांच्या राजीनाम्याचे नाटक केल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, विरोधी पक्षांनी पुराव्यांसह आरोप करून उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु, त्यास साफ नकार देत यापूर्वीच्या सरकारच्या काळातच गैरव्यवहार झाल्याचे सांगून उद्योग मंत्र्यांनी स्वतःचा केविलवाणा बचाव केला. उद्योग मंत्र्यांना त्यांच्या विभागात यापूर्वी गैरव्यवहार झाल्याचे माहिती होते तर तीन वर्ष ते झोपले होते का? शिवसेनेमध्ये नैतिकता असती तर गैरव्यवहार उघडकीस आल्यावर तातडीने उद्योग मंत्र्यांचा राजीनामा घेतला असता. परंतु, त्यावेळी भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत कानावर हात ठेवले आणि आता जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुभाष देसाईंचे समर्थन केल्याबाबत विखे पाटील म्हणाले की, शिवसेना पूर्वीपासूनच भ्रष्टाचाराचे समर्थन करीत आली आहे. मुंबई महानगर पालिका देशातील भ्रष्ट महापालिका म्हणून ओळखली जाते. परंतु, उद्धव ठाकरे यांनी नेहमीच त्याबाबत डोळेझाक केली आहे. गेल्या महिन्यात घाटकोपरमध्ये इमारत कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेसाठी मुंबई महानगर पालिका व शिवसेना कार्यकर्त्याचा भ्रष्टाचार कारणीभूत होता. मुंबई महापालिकेच्या कारभारावर बोट ठेवणारे मलिष्काचे गाणे शिवसेनेला झोंबले होते. कारण त्यात वस्तुस्थिती होती. त्यामुळे शिवसेनेने भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सुभाष देसाईंची पाठराखण करण्यात काहीच आश्चर्य नाही.