Published On : Wed, Aug 9th, 2017

इंदिराजी देशातील आजवरच्या सर्वात लोकप्रिय व शक्तीशाली पंतप्रधान!: विखे पाटील

392025-vikhe-patil

मुंबई: स्व. इंदिरा गांधी या देशातील आजवरच्या सर्वात लोकप्रिय व शक्तीशाली पंतप्रधान असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

इंदिराजी गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आज विधानसभेत सरकारने मांडलेल्या गौरव प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. आपल्या भाषणामध्ये विखे पाटील यांनी स्व. इंदिरा गांधी यांनी देशासाठी दिलेल्या अपूर्व योगदानाचा उहापोह केला. ते म्हणाले की, त्यांची कारकिर्द केवळ भारताच्या नव्हे तर आंतरराष्ट्रीय इतिहासावर परिणाम करणारी होती. त्यामुळे जागतिक स्तरावरील प्रमुख नेत्या बनल्या. इंदिराजी गांधी भारतातील महिला क्रांतीच्या प्रतिक होत्या. त्यांनी आयुष्यभर गरीब, शोषित, अनुसूचित जाती-जमाती, मागास आणि अल्पसंख्यकांसाठी लढा दिला. भारतीय राज्य घटनेच्या प्रस्तावनेत ‘समाजवाद’ हा शब्द समाविष्ट करण्यात त्यांचा पुढाकार होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची घटना लिहिताना समाजवाद आणि सर्वसमावेशकतेची संकल्पना मांडली होती. इंदिराजी गांधी यांनी त्याच संकल्पनेला केंद्रबिंदू मानून वाटचाल केली.

स्वातंत्र्यानंतर पहिली दोन दशके पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या विकासाची पायाभरणी केली. 1966 मध्ये इंदिराजी पंतप्रधान झाल्यानंतर देश स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करू लागला. इच्छाशक्ती, निर्णयक्षमता, मुत्सद्देगिरी आणि कणखरतेच्या बळावर त्यांनी अनेकदा जागतिक महासत्तांचे दबाव देखील झुगारून लावले. 1971 मध्ये बांग्लादेशी निर्वासितांचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यांनी भल्या-भल्यांना धक्का देत बांग्लादेश स्वतंत्र केला. त्यावेळी भारतावर दबाव आणण्यासाठी अमेरिकेने नौदलाचे सातवे आरमार हिंद महासागराकडे रवाना केले. पण इंदिराजी डगमगल्या नाहीत. पंतप्रधान झाल्यानंतर अनेकांनी ‘गुंगी गुडिया’ संबोधून त्यांच्या कर्तृत्वावर शंका निर्माण केली. पण पाकिस्तानचे दोन तुकडे केल्यानंतर त्यांचा ‘दुर्गा’म्हणून गौरव झाला. ‘गुंगी गुडिया’ ते ‘दुर्गा’चा हा प्रवास त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देण्यास पुरेसा असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. इंदिरा गांधींनी हे धाडस दाखवले नसते तर आज पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजुंनी पाकिस्तानने भारताच्या सीमा अशांत ठेवल्या असत्या, असेही ते आवर्जून म्हणाले.

इंदिरा गांधी यांनी 1974 मध्ये पोखरणला अणुचाचणी केली. अंतराळ संशोधनाला गती देण्यासाठी त्यांनी स्वतंत्र अंतराळ संशोधन विभाग स्थापन केला. त्यांच्याच कार्यकाळात भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट यशस्वीपणे अंतराळात झेपावला. त्यानंतर राकेश शर्मांनी अंतराळात जाऊन ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा’ असल्याचे जगाला दाखवून दिले. इंदिराजी खऱ्या अर्थाने ‘आयर्न लेडी’ होत्या. बॅंकांचे राष्ट्रीयकरण, संस्थानिकांचे तनखे व किताब रद्द करणे, कमाल जमीनधारणा कायदा, खाणींचे राष्ट्रीयकरण असे अनेक कठोर निर्णय त्यांनी घेतले. पंडित नेहरूंप्रमाणेच इंदिरा गांधी यांनीही सार्वजनिक उपक्रमांना प्रोत्साहन देऊन अनेक नवे उपक्रम सुरू केल्याचे विखे पाटील यावेळी म्हणाले.

भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे केल्यामुळे पाकिस्तान सतत बदल्याच्या भावनेतून खलिस्तानी फुटीरवाद्यांना चिथावणी देत होता. खलिस्तानी अतिरेकी पंजाबला स्वतंत्र राष्ट्र जाहीर करण्याइतपत गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. या फुटीरवाद्यांना पाकिस्तान व अमेरिकाचा पाठिंबा मिळणार होता. त्यामुळे इंदिराजींनी कटू निर्णय घेत लष्करी कारवाई केली व भारताच्या अखंडतेला निर्माण झालेला धोका संपुष्टात आणला. या कारवाईनंतर त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. परंतु, गुप्तचर यंत्रणांचे सारे इशारे त्यांनी धुडकावून लावले. इतका दृढनिश्चय सामान्य माणसाच्या ठायी असूच शकत नाही. त्या असामान्य व अतुलनीय होत्या, हे त्यांनी आपल्या निर्णयांमधून दाखवून दिले, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.


इंदिराजी गांधी यांनी हत्येच्या एक दिवस अगोदर ओडिशात केलेल्या शेवटच्या भाषणाचा उल्लेख करून ते भाषण आजही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना हेलावून टाकते, असे विरोधी पक्षनेते म्हणाले. आपले आजोबा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या निधनानंतर इंदिराजी गांधी यांनी लोणी येथे येऊन विखे पाटील कुटुंबाचे सांत्वन केल्याची आठवण सांगून राधाकृष्ण विखे पाटील यांनी इंदिराजी गांधी यांच्या संघर्षाच्या काळातील अनेक प्रसंग सांगितले. विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या भाषणाचा शेवट एक शेर सांगून केला.

‘गुंगी गुडिया’ से ‘दुर्गा’ तक का सफर

ना ही इतना आसान होता है…

कभी ‘शक्तिस्थल’ आकर देखो,

देश के लिये खुद को तबाह करना

कितना हसीन होता है….