Published On : Fri, Oct 1st, 2021

सार्वजनिक शासकीय जागेवर देशी दारूचे दुकान

– अन्नामोड परिसरात नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर,संबंधित अधिकारी कुंभकर्णी झोपेत


खापरखेडा/नागपुर – पोटा-चनकापूर ग्रामपंचायत शिवारातील अन्नामोड चौक परिसरात एका देशी दारू विक्रेत्याने सर्व नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक बांधकाम विभागाचे जागेवर अनेक वर्षांपासून दारूचे दुकान थाटले आहे त्यामुळे येथील नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे मात्र यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संबंधित अधिकारी कुंभकर्णी झोपेत असून येथील नागरिकांनी दारूचे दुकान बंद करण्यासंदर्भात आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा ईशारा दिल्याने पोटा-चनकापूर ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसभेत देशी दारूचे दुकान बंद करण्याचा ठराव मंजूर केला आहे

त्यामुळे देशी दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.खापरखेडा-दहेगाव रंगारी राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला अंतरावर मागील अनेक वर्षांपासून नियमबाह्य देशी दारूचे सुरू केले आहे सदर देशी दारूचे दुकान अन्नामोड चौक परिसरात हाकेच्या अंतरावर आहे अन्नामोड चौक हा नागपूर, सावनेर, दहेगाव रंगारी, पोटा, सिल्लेवाडा, रोहना, वलनी,आदि शहरांना जोडणारा आहे त्यामुळे याठिकाणी मोठया प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते शिवाय याठिकाणी बस थांबा असल्याने नागरिकांसह परिसरातील शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी मोठया संख्येने आढळून येतात अन्नामोड चौक परिसरात असलेल्या देशी दारूच्या दुकानात पिणाऱ्यांची मोठया प्रमाणात आहे त्यामुळे याठिकाणी दारुड्यांचे रोज भांडणे होत असतात त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे हा सर्व प्रकार पोलीस, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांना माहित आहे

मात्र सर्व मुंग गिळून बसले आहेत देशी दारूच्या दुकानाच्या पलीकडे लोकवस्ती आहे शिवाय रुग्णालय, लहान मोठी दुकाने आहेत येथील नागरिकांनी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनासह पोलिसांकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत मात्र सदर तक्रारीला केराची टोपली मिळाली आहे रोज होणाऱ्या त्रासामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी आंदोलनाचा ईशारा दिला पोटा-चनकापूर ग्रामपंचायत प्रशासनाने तक्रारीची दखल घेत २६ जानेवारी २०२० ला ग्रामसभेत देशी दारूचे दुकान बंद करण्याचा ठराव मंजूर करून प्रस्ताव पारित केला आहे सदर देशी दारूचे दुकान थाटलेली जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर असल्याची माहिती ग्राम पंचायत प्रशासन यांनी दिली असून देशी दारू दुकान ग्रामपंचायत रेकार्डवर अधिकृत नोंद नसल्याची माहिती दिली आहे .

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष
अन्नामोड चौक परिसरात मागील अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर खुलेआम देशी दारूचे दुकान सुरू आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वेळोवेळी तपासणी करण्यात येते मात्र सदर देशी दारूचे दुकान कुणाच्या जागेवर आहे याची चौकाशी करण्याची तसदी दाखविली नाही, देशात न्याय व्यवस्था आहे सर्वांसाठी एक सारखे नियम आहे देशी दारू विक्रीचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडुन मिळाला मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून देशी दारूचे दुकान सुरू करने न्यायसंगत नाही त्यामुळे देशी दारु दुकान मालक यांच्यावर कायदेशीर कार्यवाही यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.