नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी करत किवी संघावर 48 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारताने निर्धारित 20 षटकांत 238 धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर अभिषेक शर्मा याने आक्रमक फलंदाजीचा अप्रतिम नमुना सादर करत 84 धावांची स्फोटक खेळी केली आणि तोच भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. शेवटच्या षटकांत रिंकू सिंह याने संयमी पण तितकीच प्रभावी फलंदाजी करत नाबाद 44 धावा जोडल्या.
238 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 190 धावांत आटोपला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच किवी फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. शिवम दुबे आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1-1 फलंदाज बाद केला.
आकडेवारीतही भारतच वरचढ-
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 26 टी-२० सामन्यांपैकी 15 सामने भारताने जिंकले आहेत. न्यूझीलंडला 10 विजयांवर समाधान मानावे लागले, तर एक सामना अनिर्णित राहिला. भारतात खेळलेल्या टी-२० सामन्यांमध्येही टीम इंडियाचे वर्चस्व स्पष्ट असून, 12 पैकी 8 सामने भारताने जिंकले, तर किवींना केवळ 4 विजय मिळवता आले आहेत.
संघरचना-
न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन –
टिम रॉबिन्सन, डेव्हन कॉनवे, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरेल मिचेल, मिचेल सॅन्टनर, क्रिस्टियन क्लार्क, काइल जेमिसन, ईश सोढी, जेकब डफी.
भारताची प्लेइंग इलेव्हन –
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.









