नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात निर्णायक पावले उचलली आहेत. या हल्ल्यानंतर पंधरवड्याभरातच भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी गटांच्या ९ तळांवर जोरदार हवाई कारवाई केली. भारताच्या या कारवाईत पाकिस्तानच्या सीमेपलीकडील सुमारे १०० किमी आत घुसून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यात १०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
२२ एप्रिलला पहल्गाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर भारत सरकारने सिंधू जल करारासह पाच महत्त्वाचे निर्णय घेतले, ज्यामुळे पाकिस्तानवर दबाव वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आश्वासन दिले होते की, दहशतवाद्यांना कुठल्याही परिस्थितीत पाठीशी घालणार नाही.
या पार्श्वभूमीवर, जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये काल रात्री ११ वाजेच्या सुमारास १० ते १३ दहशतवाद्यांनी भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीमा सुरक्षा दलाच्या सतर्क जवानांनी हा कट हाणून पाडत सात दहशतवाद्यांचा ठार केला. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर गोळीबार झाला, आणि घनघोर अंधारात देखील जवानांनी धाडसाने प्रत्युत्तर दिले.
दुसरीकडे, पठाणकोट सेक्टरमध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या एक लढाऊ विमानाचा पाडाव केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे विमान F-16 असू शकते, तर काही अहवालांमध्ये JF-17 असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कारवाईत भारताने दोन पाकिस्तानी पायलट्सना जिवंत पकडल्याची माहितीही समोर येत आहे. पाकिस्तानने जम्मू आणि पंजाब सीमेवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न केला होता, परंतु भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेनं S-400 प्रणालीच्या मदतीने हे हल्ले यशस्वीरित्या परतवले. भारत-पाकिस्तानमधील संबंध सध्या अत्यंत तणावपूर्ण स्थितीत असून परिस्थितीवर जगभर लक्ष केंद्रित झाले आहे.