Published On : Tue, Jan 29th, 2019

इंडिया फॉर इथेनॉल’ मोहिम सोशल मिडियावर 

गडकरींनी केले ‘वेब पोर्टल’चे लोकार्पण ः शेतकरी, बेरोजगारांना थेट संपर्काची संधी 

नागपूर: गेल्या एका तपापासून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉलचा इंधनात वापर करून पर्यावरणपूरक वाहतुकीवर भर दिला. इथेनॉलनिर्मितीसाठी आवश्‍यक शेती उत्पादनामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदलाची क्षमता या प्रकल्पात आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीसोबतच शेतकरी, बेरोजगारांना रोजगार मिळावा या हेतूने देशभरात मोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ‘इंडिया फॉर इथेनॉल’ या ‘वेब पोर्टल’चे लोकार्पण केले. तूर्तास हिंदीत असलेले वेब पोर्टल नजिकच्या काळात सर्वच प्रादेशिक भाषेत तयार करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी नमुद केले.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी गेल्या बारा वर्षांपासून इथेनॉलनिर्मितीसाठी प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे तत्कालीन सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांनी टाकाऊ शेती उतादनापासून इथेनॉलची संकल्पना मांडली होती. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी या संकल्पनेला मूर्त रुप देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी संशोधक डॉ. हेमंत जांभेकर यांच्यावर इथेनॉलनिर्मितीची जबाबदारी सोपविली. आज वाहनांच्या इंधनात 10 टक्‍क्‍यांपर्यंत इथेनॉलचा वापर केला जातो. मात्र, पेट्रोल, डिझेलमध्ये याचा वापर 30 टक्‍क्‍यांपर्यंत वाढविल्यास कच्चे तेल आयात करण्यावर होणारा सात लाख कोटीचा देशाचा खर्च वाचेल आणि देशाची आर्थिक स्थिती सुदृढ होण्यास मदत होणार आहे. 30 टक्के इथेनॉलमिश्रीत इंधनाचा वापर आजही केला जाऊ शकतो, या प्रयोगाचा एक व्हीडीओ या वेब पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. देशात मोठ्या प्रमाणात अन्न धान्य तयार होते. परंतु या कृषी मालाला योग्य दर न मिळाल्याने शेतकरी नैराश्‍याने ते फेकून देतो. या कृषी मालाचा उपयोग इथेनॉलनिर्मितीसाठी केल्यास देशातील शेतकरी समृद्ध होईल, शिवाय कृषी उद्योगाला जागतिक स्तरावर मान मिळेल. गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारने बायो सीएनजी, बायो इथेनॉलसाठी प्रयोग सुरू केले. परंतु यात आणखी वाढ व्हावी, यासाठी ‘इंडिया फॉर इथेनॉल’ वेब पोर्टलवर सर्वच माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वेब पोर्टलवर शेतकरी, बेरोजगार, व्यापाऱ्यांना थेट संपर्क साधून इथेनॉल निर्मिती प्रकल्पाबाबत माहिती घेता येणार आहे. एवढेच नव्हे इथेनॉल निर्मितीसाठी कार्य करणारे संशोधक व अभियानाचे संयोजक डॉ. हेमंत जांभेकर यांच्याशीही थेट संपर्क साधून माहिती मिळविणे शक्‍य होणार आहे. एवढेच नव्हे लोकांना त्यांच्याकडील बायोफ्यूएलसंबंधी माहितीही www.Indiaforethanol.net या वेबपोर्टलवर शेअर करता येणार असल्याचे संयोजक अजित पारसे यांनी सांगितले.

आज ब्राझीलसह अनेक युरोपियन देशांमध्ये ‘फ्लेक्‍स इंजिन’ तयार केले जात असून 10 ते 100 टक्के इथेनॉलवर वाहने धावत आहेत. भारतातही हे शक्‍य असून भविष्यात बायो फ्यूएल जगात निर्यात केले जाईल. देशाच्या प्रगतीसाठी सोशल मिडियाद्वारे शेतकरी, तरुणाई, उद्योजक व संशोधकांनी ‘इंडिया फॉर इथेनॉल’ मोहिमेत सहभागी व्हावे.

– नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते, परिवहनमंत्री, आधारस्तंभ, इंडिया फॉर इथेनॉल.
कोट्‌स..

सोशल मिडियाद्वारे देशात ‘इंडिया फॉर इथेनॉल’ अभियान राबवून शेतकरी, उद्यमशील तरुणांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या या अभियानात सामील होऊन राष्ट्र समृद्ध, स्वावलंबी करावे. यासंबंधी सर्वच मंत्रालयाच्या सहकार्याने नागपुरात एक मोठे संशोधन केंद्र तयार करण्यात यावे. या अभूतपूर्व योजनेसाठी सरकार व जनतेत समन्वय आवश्‍यक आहे.

– अजित पारसे, संयोजक, इंडिया फॉर इथेनॉल, सोशल मीडिया विश्लेषक.