
नागपूर – नागपूर शहरात महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या घटनांनी पुन्हा एकदा गंभीर रूप घेतले आहे. नंदनवन, यशोधरा, सिव्हिल लाईन्स अशा विविध भागांत महिला छेडछाड, मारहाणी आणि सायबर धमक्यांसह विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा आलेख वाढत आहे. या घटनांनी नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण केले असून, स्थानिक लोक पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील काही महत्त्वाच्या घटनांचा आढावा पाहूया.
नंदनवन परिसरात रस्त्यावर महिलेची छेडछाड, नागरिकांनी आरोपीला चोप दिला-
नंदनवन परिसरात ३२ वर्षीय महिला बाजारात पूजा साहित्य खरेदीसाठी आपल्या मुलीसोबत असताना आरोपी समीर सिद्दीकी उर्फ यासिन हुसेन यांनी तिचा पाठलाग करत छेडछाड केली. त्यानंतर आरोपीने जबरदस्तीने दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केला. महिलांच्या आरडाओरडीनंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून जोरदार मारहाण केली. आरोपीविरुद्ध आधीपासून छेडछाडीचे गुन्हे आहेत, पण पोलिसांनी त्याला नोटीस देऊन सोडल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे.
यशोधरा थाण्यात तरुणीशी छेडछाड प्रकरण-
यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २० वर्षीय तरुणीशी छेडछाड झाली. आरोपी खुशाल जवळीकर नावाचा ४५ वर्षीय व्यक्ती कामाच्या बहाण्याने तरुणीच्या घरी गेला आणि तिच्याशी गैरवर्तन केले. पीडितेने तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सिव्हिल लाईन्समध्ये महिलेला अश्लील बोलणे-
सिव्हिल लाईन्स परिसरातून जात असलेल्या ४१ वर्षीय महिलेवर लोकेश बरदानसिंग ठाकूर आणि शिव ठाकूर यांनी अश्लील बोलणे व टोमणे दिले. याप्रकरणीही पोलीस गुन्हा नोंदवून तपास करत आहेत.
सायबर गुन्हा : विद्यार्थिनीची मोबाईल हरवल्यानंतर बदनामी-
२३ वर्षीय विद्यार्थिनीच्या बॉयफ्रेंडचा आयफोन हरवल्यानंतर अज्ञात आरोपींनी तिला व्हिडिओ कॉल करून अश्लील व्हिडिओ पाहण्याचा दबाव आणला. नकार दिल्यावर तिचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
नागरिकांचा इशारा-
नंदनवन व परिसरात महिलांविरोधातील घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. पोलिसांनी कडक कारवाई केली नाही तर मोठा सामाजिक संघर्ष उद्भवू शकतो, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.










