नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सातव्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या दक्षिण-पश्चिम, पश्चिम आणि पूर्व नागपूर विधानभा क्षेत्रातील तीन ठिकाणच्या विभागीय कार्यालयांचे सोमवारी (ता.६) उद्घाटन झाले.
पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते पूर्व नागपूरातील गिरनार बँक, संजय हॉटेल जवळ येथील कार्यालयाचे उद्घाटन आणि पश्चिम नागपुरातील भाजपा कार्यालय यश कॉम्प्लेक्स रवी नगर चौक येथील कार्यालयाचे माजी आमदार श्री. सुधाकरराव देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन झाले. दक्षिण-पश्चिम नागपूरमधील नक्षत्र सभागृह प्रतापनगर चौक येथील कार्यालयाचे उद्घाटन दक्षिण-पश्चिमचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या हस्ते झाले.
दक्षिण-पश्चिम येथील कार्यक्रमात भाजपा दक्षिण-पश्चिम नागपूरचे अध्यक्ष श्री. रितेश गावंडे, माजी महापौर नंदाताई जिचकार, माजी नगरसेवक प्रमोद तभाने, लहुकुमार बेहते, लखन येरवार, दिलीप दिवे, पूर्व नागपूर येथील कार्यक्रमात नागपूर शहर संपर्क प्रमुख श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, पूर्व नागपूर अध्यक्ष श्री. सेतराम सेलोकर, पश्चिम नागपुरातील कार्यक्रमात पश्चिम नागपूर अध्यक्ष श्री. विनोद कन्हेरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवाला १२ जानेवारी २०२५ पासून सुरुवात होत आहे. २ फेब्रुवारी २०२५ पर्यंत २० दिवस शहरातील ७३ क्रीडांगणांवर ६१ खेळ खेळले जातील. यात विविध ६१ खेळांच्या तब्बल २९०० चमू, ६००० ऑफिसियल्स, ८० हजार खेळाडूंचा समावेश असेल. एकूण १३१०० स्पर्धा खेळविण्यात येणार असून यात खेळाडूंना १२३१७ मेडल्स आणि ७६२ ट्रॉफी देण्यात येतील. स्पर्धेतील विजेत्यांना १ कोटी ५० लक्ष रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात येणार आहेत.
शहरातील जास्तीत जास्त खेळाडूंना या भव्य खासदार क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी होता यावे, सहभागी होताना आवश्यक नोंदणी करण्यासाठी सुलभता प्रदान व्हावी याउद्देशाने विधानसभा मतदार संघनिहाय कार्यालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यालयांच्या माध्यमातून आणखी मोठ्या संख्येने खेळाडू या महोत्सवात सहभागी होऊन पुढे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नागपूर शहराचे नाव लौकीक करतील, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
खासदार क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना स्पर्धेमध्ये नोंदणी करणे, स्पर्धेसंदर्भात माहिती मिळविणे किंवा क्रीडा विषयक मदतीसाठी या विभागीय कार्यालयांची मदत होणार आहे.