Published On : Thu, Sep 2nd, 2021

मातृ वंदना सप्ताहाचे महापौरांच्या हस्ते शुभारंभ

Advertisement

नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभाग आणि नागपूर महानगरपालिकेच्या वतीने प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबरदरम्यान मातृ वंदना सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचा शुभारंभ महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते बुधवारी (ता. १) करण्यात आला.

यावेळी मनपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दिव्या धुरडे, नगरसेवक संदीप जाधव, नगरसेविका प्रगती पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहायक अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी, जिल्हा कार्यक्रम समन्वयक रज्जू परिपगार, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अश्निनी निकम, समन्वयिका दीपाली नागरे उपस्थित होत्या.

यावेळी मातृ वंदन योजनेअंतर्गत महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते राजश्री राकेश राऊत या माता लाभार्थीला नोंदणी फॉर्म देऊन सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहर हद्दीत ही योजना राबविण्यात येत असून प्रत्येक गरोदर आणि स्तनदा मातांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केले. या योजनेची माहिती प्रत्येक माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

तत्पूर्वी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी महापौरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी मातृ वंदना योजनेबाबत आणि सप्ताहात राबविण्यात येणाऱ्या जनजागृती कार्यक्रमाबाबत माहिती दिली.

काय आहे मातृ वंदना योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि नागपूर महानगरपालिका यांच्या वतीने राबविण्यात येत आहे. कुटुंबातील पहिल्या जिवंत अपत्यासाठी मातेला पाच हजार रुपयांचा लाभ या योजनेअंतर्गत मिळतो. सर्व स्तरातील गरोदर व स्तनदा माता यासाठी पात्र आहेत. मात्र, प्रसूती रजेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीला योजनेचा लाभ देय नाही. या योजनेअंतर्गत मासिक पाळी चुकल्यानंतर १५० दिवसांच्या आत शासकीय दवाखान्यात नोंद असल्यास एक हजार रुपयांचा पहिला लाभ मिळतो.

दुसरा लाभ सहा महिन्यात शासकीय किंवा खासगी दवाखान्यात किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी केल्यास रु. २००० हजार रुपयांचा दुसरा लाभ तर प्रसूतीनंतर बाळाच्या जन्माची नोंद व बाळाचे १४ आठवड्यापर्यंतचे लसीकरण पूर्ण केले असल्यास दोन हजार रुपयांचा तिसरा लाभ प्राप्त होतो. यासाठी लाभार्थी व पतीच्या आधार कार्डची सत्यप्रत, बँक किंवा पोस्ट ऑफिस आधार संलग्न पासबुकच्या पानाची सत्यप्रत, एमसीपी कार्ड सत्यप्रत, बाळाचा जन्माचा दाखला, बाळाचे १४ आठवड्यापर्यंतचे लसीकरण झाल्याचा दाखला इत्यादि कागदपत्रे आवश्यक आहेत. यासाठी सर्व शासकीय दवाखाने, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांच्याशी संपर्क साधता येईल.