Published On : Mon, Aug 17th, 2020

रामदेवबाबा अभियांत्रिकी आणि टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांच्या सीआयआयआयटी अत्याधुनिक केंद्राचे उदघाटन

श्रीरामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांच्या संयुक्त प्रयत्नातून उभारलेल्या सेंटर ऑफ इन्वेंशन, इनोवेशन, इंक्युबॅशन आणि ट्रेनिंग- सीआयआयआयटी या अत्याधुनिक केंद्राचे उदघाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि सूक्ष्म लघु तसेच मध्यम उद्योग मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी नुकतेच केले. इनोवेशन ,तंत्रज्ञान आणि संशोधन हाच आत्मनिर्भर भारताचा महामार्ग आहे असे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गडकरी यांनी आपल्या उदघाटनपर भाषणात म्हटले. सध्याच्या परिस्थितीत नवनवीन क्षेत्रामध्ये जागतिक संधी उपलब्ध आहेत आणि संपूर्ण जग भारताकडे मोठ्या आशेने बघत आहे. आत्मनिर्भर भारताची भूमिका इनोव्हेशन, तंत्रज्ञान आणि संशोधन याच त्रिसूत्रीवर आधारित असेल असेही गडकरी म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी श्रीरामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयासारख्या उच्च शैक्षणिक संस्थानी अशा प्रकारचे अधिकाधिक संयुक्त उपक्रम राबवावे असा आशावाद व्यक्त केला. सीआयआयआयटी आणि अन्य अश्या उपक्रमांना आपले मंत्रालय संपूर्ण सहकार्य देईल अशी ग्वाही त्यांनी दिली. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने तसेच नागपूर आणि विदर्भाच्या दृष्टीने उभारलेले हे केंद्र एक नव्या संधीचे दालन खुले करून देईल अशी आशा गडकरींनी व्यक्त केली.

रामदेवबाबा आणि टाटा टेक्नॉलॉजीजच्या संपूर्ण चमूचे त्यांनी अभिनंदन केले. टाटा टेक्नॉलॉजीजचे संचालक सुशीलकुमार सिंग यांनी या केंद्र स्थापनेची पार्श्वभूमी विशद केली. पुस्तकातील ज्ञान प्रात्यक्षिक स्वरूपात करण्यासाठी या केंद्राचा मोठा उपयोग होईल असे सिंग म्हणाले. टाटा टेक्नॉलॉजी आणि रामदेवबाबा महाविद्यालय नजीकच्या काळात इलेक्ट्रिक व्हेईकल संदर्भात एक प्रकल्प नागपुरात प्रारंभ करीत आहे असेही ते म्हणाले.


रामदेवबाबा महाविद्यालयाचे उपाध्यक्ष आणि सोलर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांनी रामदेवबाबा अभियांत्रिकी सोबत संयुक्तपणे हे केंद्र स्थापन केल्याबद्दल टाटा टेक्नॉलॉजीज चे आभार मानले प्राचार्य डॉ. राजेश पांडे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा चढता आलेख आणि उपलब्धी याबद्दल उपस्थितांना अवगत केले. डॉ.पांडे म्हणाले यावर्षी महाविद्यालयाने पाच नवीन अभ्यासक्रम इंजिनीरिंग पदवी अंतर्गत सुरू केले आहे ज्यात डेटा सायन्स ,सायबर सिक्युरिटी ,आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग तसेच बायोमेडिकल अभियांत्रिकी यांचा समावेश आहे रोबोटिक्स शाखेत एमटेक हा देखील नवे अभ्यासक्रम यंदाच्या २०२०-२०२१ सत्रापासून प्रारंभ होतील.

सीआयआयआयटी या केंद्राच्या माध्यमातून आधुनिक अभियांत्रिकी उपकरणे यांची अद्ययावत माहिती आणि ती प्रत्यक्ष हाताळण्याबाबतची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या केंद्रात आधुनिक शॉप फ्लोर मशीन ,वर्टीकल मशीन सेंटर , आर्क वेल्डिंग रोबोट, पिक अँड प्लेस रोबोट, थ्रीडी प्रिंटर, थ्रीडी स्कॅनर, आयओटी सेन्सर किट आणि दहा अत्याधुनिक सॉफ्टवेअर यासह विविध उपकरणांचा समावेश आहे.कार्यक्रमाला रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय सुकाणू समितीचे अध्यक्ष श्यामसुंदर राठी, कोषाध्यक्ष अशोक पचेरीवाला, सचिव राजेंद्र पुरोहित, अधिवक्ता प्रदीप अग्रवाल आणि दिनेश अग्रवाल, आनंद भदे, अध्यक्ष ,अशिया पॅसिफिक, टिटीएल, पी व्ही कौलगुड ,ग्लोबल सीईओ आणि संचालक इलेक्ट्रिकल अँड एज्युकेशन ,हर्ष गुणे सीईओ , विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रियल हब, वास्तूविशारद राजेंद्र डोंगरे आणि प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.