Published On : Fri, Sep 22nd, 2017

ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

Advertisement

नागपूर : कामठी येथील ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी त्यांनी विपश्यना परिसरातील कोनशिलेचे अनावरण केले.यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, ड्रॅगन पॅलेस टॅम्पलच्या संस्थापिका सुलेखा कुंभारे आदी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रपतींनी यावेळी विपश्यना सेन्टरमधील बुद्ध मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर पाच मिनिटे ध्यानधारणा केली.कामठी येथील दादासाहेब कुंभारे परिसरात सुमारे 10 एकर परिसरात विपश्यना मेडिटेशन सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये 83 फुट उंचीचा आकर्षक असा मुख्य पॅगोडा बांधण्यात आला आहे.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या पॅगोडाच्या चारही बाजूला दहा फुट उंचीचे चार पॅगोडा तयार करण्यात आले आहे. ओगावा सोसायटी तर्फे ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात मेडिटेशन सेंटर राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सहकार्याने बांधण्यात आले आहे. राज्य शासनाने विपश्यना केंद्राच्या संकल्पनेची दखल घेऊन विपश्यना सेंटरसाठी अर्थसहाय उपलब्ध करुन दिले आहे. या सेंटरमध्ये विपश्यना साधन शिबीर घेण्यात येणार आहे.

विपश्यना मेडिटेशनमध्ये ध्यान साधनेकरीता दोन सभागृह उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यात तळमजल्यावर चोवीस कक्ष बांधण्यात आले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या माळयावर तीन हजार चौरस फुट क्षेत्रफळाच्या वर्तुळाकार धम्म सभागृह बांधण्यात आले आहे. येथे 125 साधक एकाच वेळेस सामुहिक धम्म साधना करु शकतील. या ठिकाणी येणाऱ्या साधकांच्या निवासस्थानासाठी 2400 चौ. फुट क्षेत्रफळामध्ये स्वतंत्र आणि सामुहिक निवासव्यवस्था करण्यात आली आहे. भोजन व्यवस्थेकरीता महिला आणि पुरुषांकरीता स्वतंत्र दोन कक्ष बांधण्यात आले आहेत. सेंटरच्या सौंदर्यीकरणासाठी संपूर्ण भागात लॉन आणि बगीचा तयार करण्यात येणार आहे. या सेंटरच्या बांधकामाचा आराखडा प्रसिध्द शिल्पतज्ञ ठाकुरभाई पारेख तर इमारतीचे डिझाइन पी. टी. मसे असोशिएट्स यांनी केले आहे.

बुद्ध वंदना
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ड्रॅगन पॅलेस टेंपलला भेट दिली. यावेळी त्यांनी बुद्ध मूर्तीचे दर्शन घेऊन बुद्ध वंदना केली. याप्रसंगी सुलेखा कुंभारे यांनी प्रार्थना म्हटली. राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते.

Advertisement
Advertisement