नागपूर : शहरातील २२ वर्षीय आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू जयंत जयप्रकाश दुबळेने आपल्या रिले टीम सोबत इंग्लिश खाडी(टू वे) पोहून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याच्या या विक्रमी कामगिरीने नागपूरच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला.
विक्रमाने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारताचे नाव आंतरराष्ट्रीय समुद्री जलतरणामध्ये नोंदविण्यात आले. इंग्लिश चॅनेलचे एका बाजूचे म्हणजे इंग्लंड ते फ्रान्स दरम्यानचे अंतर हे ३५ किमी आहे. जयंत व त्याच्या टीमने हे अंतर पोहून लगेच परत फ्रान्स वरून इंग्लंड असे एकूण ७० किमीचे अंतर पार केले.
अंबाझरी तलाव, नागपूर सुधार प्रन्यास व सेरसा रेल्वे स्विमिंग पूलवर वडील व आंतरराष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक डॉ. जयप्रकाश दुबळे व डॉ. संभाजी भोसले यांच्या मार्गदर्शनात सराव केल्याने हे शक्य झाले असल्याचे जयंत दुबळे याने सांगितले. जिद्द , मेहनत व योग्य मार्गदर्शनामुळेच मी हा विक्रम प्रस्थापित करू शकलो, असेही जयंत म्हणाला.