Published On : Fri, Aug 6th, 2021

बारावीच्या निकालात मनपाच्या विद्यार्थिनींची भरारी

Advertisement

महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले कौतुक : दर्शनी सुपटकर तिनही शाखेधून प्रथम

नागपूर : एकीकडे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कन्या पदक जिंकून देशाचा मान उंचावित आहेत. तर दुसरीकडे नागपूर महानगरपालिकेच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादित करून मनपाचा गौरव केला आहे. एकूण देशातील कन्यांचे हे यशाचे पर्व आहे, अशा शब्दांत महापौर दयाशंकर तिवारी यांनी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थिनींचे कौतुक केले.

बारावीच्या निकालामध्ये मनपाच्या कनिष्ठ महाविद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला असून यामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान या तिनही शाखांमधून मुलींनीच प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावित भरारी घेतली आहे. मनपाच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांमधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेची विद्यार्थिनी दर्शनी प्रभाकर सुपटकर हिने ९१.८६ टक्के गुण प्राप्त करीत तिनही शाखेमधून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. मनपाच्या तिन्ही कनिष्ठ महाविद्यालयामधून १०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. प्राविण्य श्रेणीमधे ४९ आणि प्रथम श्रेणीमधे ५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मनपाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

मंगळवारी (ता.३) जाहीर झालेल्या बारावीच्या निकालामध्ये मनपाच्या प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा बुधवारी (ता.४) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभामध्ये उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, समिती सदस्या संगिता गि-हे, परिणिता फुके, नगरसेवक हरीश ग्वालबंशी, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, सहायक शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेंद्र सुके, सुभाष उपासे, सहायक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय दिघोरे, विनय बगले आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, बारावीमध्ये मनपाचा निकाल शंभर टक्के लागणे ही आनंददायी बाब आहे. मनपाचे सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणे ही समाधानकारक बाब आहे. परीक्षा झालेल्या नसल्या तरी वर्षभर विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. मनपाच्या या निकालात मुलींची लक्षवेधी कामगिरी म्हणजे अंतरीक्षापासून ते गिर्यारोहणपर्यत सर्व क्षेत्रात ठसा उमटवणा-या मुलींनी आम्ही कुठेही कमी नाहीच, याची पुन्हा एकदा दिलेली प्रचिती आहे, असेही ते म्हणाले.

दहावी आणि बारावीनंतर विद्यार्थ्यांना करीअरविषयी निर्माण होणारे संभ्रम व त्यात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी मनपा मुख्यालयात महापौर कार्यालयाजवळ समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. आवश्यक ते मार्गदर्शन मिळवून, आपल्या मनपातील शंकांचे निरसन करून आपले पुढील करीअरची वाट निवडता यावी, यादृष्टीने हे समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी समुपदेशन केंद्रामध्ये विशाल कोठारी मार्गदर्शन करतात. या समुपदेशनाचा प्रत्येक विद्यार्थ्याने लाभ घ्यावा, असे आवाहनही महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केले. सोबतच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांची ऑनलाईन बैठक घेवून त्यांना भविष्याकरीता योग्य मार्गदर्शन करण्याचे निर्देश महापौरांनी शिक्षण विभागाला दिले.

उपमहापौर मनीषा धावडे यांनी मनपाच्या विद्यार्थिनींच्या निकालाबाबत आनंद व्यक्त करीत सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी मनपाच्या तिनही शाखेचा शंभर टक्के निकाल हे शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे फलीत असल्याचे सांगितले. मनपाच्या निकालाचा टक्का दरवर्षी वाढतो आहे. यावेळी परीक्षा नसल्या तरी मुल्यांकनानुसार मनपाच्या विद्यार्थ्यांची कामगिरी स्तूत्य असल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांनी प्रास्ताविकात निकालाची सविस्तर माहिती सादर केली. आभार राजेन्द्र सुके यांनी मानले.

प्राविण्यप्राप्त विद्यार्थी (अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय)
कला शाखा : झैनाब बानो अब्दुल करीम (८३.५ टक्के), अर्शीया बानो झुबेर अहमद (८२.८३ टक्के), अल्फीया फातीमा जाफर अंसारी (८१.५० टक्के, तिनही विद्यार्थिनी एम.ए.के. आझाद मनपा उर्दू कनिष्ठ महाविद्यालय)

वाणिज्य शाखा : शाजीया परवीन मोहम्मद फारूक (८६ टक्के), सुमैया कौसर मो. कासीम (८५ टक्के), अस्माक कौसर मो. अनीस (८४ टक्के, तिनही विद्यार्थिनी एम.ए.के. आझाद मनपा उर्दू कनिष्ठ महाविद्यालय)

विज्ञान शाखा : दर्शनी प्रभाकर सुपटकर (९१.८६ टक्के, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय), फौजीया परवीन शेख आयुब (८८.१६ टक्के), मुस्कान परवीन मो. रईस (८८ टक्के, दोन्ही विद्यार्थिनी एम.ए.के. आझाद मनपा उर्दू कनिष्ठ महाविद्यालय)

मागासवर्गीय विद्यार्थी : जय श्यामराव गेडाम (८३ टक्के, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय)