Published On : Thu, Sep 23rd, 2021

अन् 61 अनुकंपाधारकांच्या आयुष्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पेरला आनंद

• समुपदेशनातून जागेवरच मिळाले नियुक्तीपत्र
• योगेश कुंभेजकर यांचा निर्णय
• नोकरीची अखेर प्रतीक्षा संपली

नागपूर :युवकांना नोकरीसाठी सर्वत्र भटकंती करावी लागत असतानाच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सन 2008 पासून अनुकंपा तत्वावर प्रतीक्षेत असलेल्या 61 पात्र प्रतीक्षार्थीना समुपदेशनासाठी बोलावून जागेवरच नियुक्ती पत्र देत सुखद धक्का दिला. या आधी 68 अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षार्थीना नियुक्ती पत्र देवून मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुंभेजकर यांनी ख-या अर्थाने अनुकंपाधारकांच्या आयुष्यात आनंद पेरत दिलासा दिला आहे.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी श्रीमती प्रिया तेलकुटे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल किटे, पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रमिला जाखलेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. लखोटे, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. सयाम, श्री. चिंतामण वंजारी शिक्षाणाधिकारी (प्राथमिक), उप अभियंता (यांत्रिकी) निलेश मानकर प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हा परिषदेमधील अनुकंपामध्ये नियुक्ती देण्यासंदर्भात सर्व विभागांमधून रितसर आलेले अर्ज नियमानुसार सर्व विभाग प्रमुखांनी तपासून जिल्हा परिषदेमधील रिक्त जागेची माहिती घेऊन विहीत कालावधीत प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर 22 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात अनुकंपा धारकांसाठी समुपदेशन प्रक्रियेव्दारे पदस्थापना देण्यासाठी या उमेदवारांना संवर्गनिहाय ज्येष्ठतेक्रमानुसार समुपदेशासाठी बोलावण्यात आले होते. जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त असणा-या पदांची व आवश्यक पात्रतेची माहिती प्रोजेक्टरवर दाखवून उमेदवारांच्या पसंतीनुसार पदस्थापना निवड करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली व जागेवरच अनुकंपाधारक उमेदवारांना नियुक्तपत्र देण्यात आले.

या अनुकंपा तत्त्वावरील 61 पात्र प्रतीक्षार्थीना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तसेच विविध विभागात रिक्त पदांच्या अनुषंगाने नियुक्ती देण्यात आली. यात कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) 23, वरिष्ठ सहाय्यक 2, कंत्राटी ग्रामसेवक 10, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) 10, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 2, शिक्षण सेवक 12, अंगणवाडी पर्यवेक्षीका 1, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 1 अशा एकूण 61 अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्र देण्यात आले. नियुक्ती देण्यात आलेल्या कर्मच्या-यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्य कार्यकारी अधिकार श्री. कुंभेजकर यांचे आभार व्यक्त केले.