अमरावती :पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा भयावह स्वरूपात समोर आला आहे. यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांमध्ये जानेवारी ते जुलै २०२५ या अवघ्या सात महिन्यांत तब्बल ५९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
सततचे दुष्काळसदृश हवामान, पिकांची नासाडी, उत्पादनाला हमीभाव न मिळणे, तसेच वाढते कर्ज आणि सावकारांचा पिळवणूक यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी जगण्याचा मार्ग बंद करून मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये सर्वाधिक आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या असून, १९६ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे.
खोलावत चाललेले कृषी संकट-
पश्चिम विदर्भातील कपाशी व सोयाबीन ही प्रमुख नगदी पिके असली, तरी पावसाचा अकार्यक्षम पॅटर्न, कीडरोगांचा प्रादुर्भाव आणि सरकारच्या बीमा योजनांचा अपुरा लाभ या सगळ्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कर्जमाफी व मदत योजना फक्त घोषणांपुरती मर्यादित राहिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
कुटुंबीयांवर आर्थिक-सामाजिक संकट-
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. त्यांना रोजच्या गरजाही भागवणे कठीण झाले असून, आर्थिक ताणाबरोबरच मानसिक आणि सामाजिक दडपणाचा देखील सामना करावा लागत आहे.
शेतकरी संघटनांची मागणी-
सतत उग्र होत चाललेल्या या प्रश्नावर शेतकरी संघटनांनी सरकारकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष मदत पॅकेज, ठोस सिंचन व्यवस्था, पारदर्शक पीकविमा योजना आणि खरीखुरी कर्जमाफी या उपाययोजना तातडीने अमलात आणण्याची आवश्यकता आहे. अन्यथा विदर्भातील हा आत्महत्यांचा सिलसिला आणखी गंभीर व भीषण वळण घेईल, अशी भीती संघटनांनी व्यक्त केली आहे.