नागपूर : पुण्यातील कल्याणीनगर भागात भरधाव पोर्श कार चालवत अल्पवयीन मुलाने तरुण आणि तरुणीला चिरडले. या ‘हिट न रन’ प्रकरणाचे पडसाद राज्याभरात उमटल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून नागपुरातही आशाच प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. नुकताच गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत अज्ञात कार चालकाने दोन महिलांना चिरडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता राघूची नगर पोलीस क्वार्टर परिसरातही भीषण अपघाताची घटना घडली.
भरधाव मोटारसायकलने दुचाकीवर स्वार दोन महिलांना जोरदार धडक दिल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. तर घटनेनंतर अज्ञात मोटारसायकल स्वार आरोपी पसार झाल्याची माहिती समोर आली.
या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून दुसरी महिला मदतीसाठी आरडाओरडा करतांना दिसत आहे. हा व्हिडीओ दोन महिन्यापूर्वीचा असून पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.