Published On : Sat, Feb 17th, 2018

डिजिटल युगाशी सुसंगत होण्यासाठी मराठी ज्ञानभाषा होणे आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

बडोदा: येत्या दहा वर्षात डिजिटल अर्थव्यवस्था समाजमनावर मोठा परिणाम करणार असल्याने त्यास सुसंगत होण्यासाठी मराठी भाषा ज्ञानभाषा होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बडोदा येथे आयोजित ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात केले.

याप्रसंगी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, मराठी भाषामंत्री विनोद तावडे, बडोद्याचे महापौर भरत डांगर, संमेलनाध्यक्ष लक्ष्मिकांत देशमुख, मावळते अध्यक्ष डॉ.अक्षयकुमार काळे, मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, स्वागताध्यक्ष श्रीमंत राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते रघुवीर चौधरी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

मराठी भाषा डिजिटल सुसंगत करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, मराठी ही अतिशय सक्षम असून ती कोणतेही आव्हान पेलण्यास समर्थ आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीच्या सर्व अडचणी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला असून लवकरच मराठी साहित्यिकांना घेऊन प्रधानमंत्र्यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावू. मराठी विद्यापीठ स्थापण्यासाठी सरकार सकारात्मक विचार करत आहे.

पुढील वर्षापासून साहित्य संमेलनाला 50 लाखांचे अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. बडोदा येथील साहित्य संमेलनात होणाऱ्या ठरावांवर अधिवेशन संपल्यानंतर पंधरा दिवसांत बैठक घेऊन निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले. आज एकाच दिवशी दोन राज्यात महत्वाची मराठी साहित्य संमेलने आयोजित झाली आहे. हा विलक्षण योगायोग असून यातच मराठीची मोठी शक्ती दिसून येते. काल सुसंगत साहित्य मराठीत सातत्याने निर्माण झाल्यानेच मराठी सक्षम आणि समर्थ झाली आहे.

एखाद्या राज्यकर्त्याने राज्य कसे उत्तम चालविता येते याचा आदर्श महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी घालून दिला आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, समाजातील उपेक्षितांना सहाय्य करुन महाराजांनी त्यांना सक्षम केले. अशा श्रेष्ठ राज्यकर्त्याच्या नगरीत होणाऱ्या साहित्य संमेलनात सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी समाधान व आनंद व्यक्त करुन आयोजकांचे अभार मानले. संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या प्रशासकीय व साहित्यिक कर्तृत्वाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. या संमलनाचे उद्घाटक ज्येष्ठ गुर्जर साहित्यिक ज्ञानपीठ विजेते रघुवीर चौधरी यांच्या साहित्यात मराठी आणि गुजराती संस्कृतिचा सुंदर संगम झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संमेलनाध्यक्ष श्री.देशमुख यांच्या चार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची लोकराज्य दालनास भेट

बडोदा येथे आयोजित ९१व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त लावण्यात आलेल्या लोकराज्य दालनास सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी भेट दिली. यावेळी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्यासह मान्यवर साहित्यिक उपस्थित होते. त्यांनी राज्य शासनाच्या प्रकाशित करण्यात येत असलेल्या विविध भाषेतील लोकराज्य मासिकासह महाराष्ट्र वार्षिकी व महामानव या पुस्तकांचे कौतुक केले.

मराठी भाषामंत्री विनोद तावडे म्हणाले, मराठी भाषा, साहित्य आणि मराठी माणूस यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, यासाठी आम्ही ताकदीने प्रयत्न करीत आहोत. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आम्ही मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रम महाराष्ट्रात घेत आहोत. भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम यांच्या जन्म दिनानिमित आम्ही वाचन दिन कार्यक्रम सुरु करुन वाचन संस्‍कृतीला चालना दिली आहे. भिलार येथील पुस्तकाच्या गावाला महाराष्ट्राचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. पुढचे संमेलन भिलार येथे करुया या संमेलनाचा संपूर्ण खर्च शासन करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, सुस्थितीतील लेखक अभिजनांसाठी लिहित राहिले तर बौद्धिक भांडवलदार ठरतात. साहित्य हे शब्दातून दु:ख, वेदना व्यक्त करते. साहित्य समाजाचे जीवनसत्व आहे. जेव्हा समाज आणि साहित्याची नाळ तुटते तेव्हा हा समाज कुरुप होतो. अशा वेळी साहित्यिकांनी समाजाला आत्मभान देणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य, बंधुता, समता हे साहित्याचे प्रमुख तत्व असले पाहिजे. मानवी दु:खाला शब्दबद्ध करणे हे साहित्याचे मुख्य कार्य आहे. लेखन हे फावल्या वेळेचे काम नाही. तो गंभीरतेने हाताळण्याचा विषय आहे. वास्तव दर्शन हे साहित्याचे प्रयोजन आहे.

लेखक, कलावंत समाजासाठी मार्गदर्शक असतात. मानवी जीवनातील सुंदरता टिकणे ही लेखकांची जबाबदारी आहे, असे सांगून ते म्हणाले, आपली वाचन संस्कृती पुरेशी विकसित झालेली नाही ती अधिक विकसित होणे गरजेचे आहे. साहित्य व इतर वाङमयाचे वाचन केले पाहिजे. शालेय ग्रंथालयाची अवस्था सुधारला पाहिजे. गंथालये ज्ञानकेंद्रे म्हणून विकसित झाली पाहिजेत. वाचन संस्कृतीचा विकास हा देशाचा व समाजाचा विकास असतो ही बाब लक्षात ठेवायला हवी असे सांगून त्यांनी बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या विकासासाठी स्वतंत्र विभाग आणि अधिकारी असावा, अशी सूचना केली.

स्वागताध्यक्ष श्रीमंत राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड आपल्या भाषणात म्हणाल्या, लेखन कला फार महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. बडोदा येथे मराठी आणि गुजराती यांचा सुंदर संगम झाला आहे. हे संमेलन म्हणजे महाराजा सयाजीराव गायाकवाड यांना दिलेली मानवंदना आहे. स्वातंत्र्याचे रक्षण भारतीय भाषांमधून करायचे आहे. त्यामुळे या भाषा सक्षम करण गरजेचे आहे. यासाठी आपण जे काम करु ते सर्व भाषांसाठी उपयुक्त ठरणार आहे. सहिष्णू माणूस घडविण्यासाठी भाषा अतिशय उपयुक्त ठरतात.

कार्याध्यक्ष दिलीप खोपकर यांनी प्रास्ताविक केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement