नागपूर : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात गेल्या २४ तासांत नवीन ११ कोरोनाचे रुग्ण आढळले. जिल्ह्यातील सक्रिय कोरोनाग्रस्तांची संख्या एकाच दिवसात दुप्पट झाल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे.
कोरोनाबाधित रुग्णांमध्ये पाच अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यात १२ वर्षीय मुलगी, १७ वर्षीय मुलगा, १५ वर्षीय मुलगा, १४ वर्षीय मुलगी, १५ वर्षीय मुलीचा समावेश आहे. ७० वर्षीय महिला, ५९ वर्षीय पुरुष, ७३ वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरुष, ७१ वर्षीय पुरुष, ३६ वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. नवीन रुग्णांमुळे शहरातील सक्रिय कोरोनाग्रस्तांची संख्या आता २२ वर पोहोचली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचे २ सक्रिय रुग्ण आहेत.
नागपुरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ४६ करोना चाचणी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा पाहता या विषयावर महापालिकेत एक बैठकही झाली. या बैठकीला वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी, डॉ. गोवर्धन नवखरे, एम्स नागपूरच्या डॉ. मीना मिश्रा, नीरीचे डॉ. कृष्णा खैरणार, मेयोचे डॉ. नितीन शेंडे, डॉ. संजय गुज्जनवार आणि इतरही अधिकारी उपस्थित होते. बैठकीत साथरोग अधिकारी डॉ. नवखरे यांनी संगणकीय सादरीकरणातून शहरातील कोरोनाची माहिती दिली.