नागपूर : प्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीतील खामला येथे वडिलांच्या बोलण्याचा राग आल्यामुळे मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. भूमिका विनोद धनवानी (१९, रा. प्लॉट नं. ४८२ , सिंधी कॉलनी, खामला) असे आत्महत्या करणाऱ्या तरूणीचे नाव आहे. विनोद धनवानी हे मोठे व्यावसायिक आहेत. त्यांना मुलगी भूमिका ही बीबीए पदवीच्या प्रथम वर्षाला तर लहान मुलगा अकरावीला आहे.
माहितीनुसार, भूमिका हिला लहानपणापासून फास्टफूड आणि जंकफुड हे बाहेरचे पदार्थ खाण्याची आवड होती. मात्र, वजन वाढण्याच्या भीतीमुळे तिची आई आणि वडिल तिला जंकफुड खाऊ देत नव्हते. मात्र, आईवडिलांच्या चोरून ती पिझ्झा, नुडल्स आणि मंच्युरियन खात होती.
सोमवारी भूमिका ही सायंकाळी नुडल्स आणि मंच्युरियन खाऊन घरी परतली. तिच्या आईने कुठे गेली होती, अशी विचारणा केल्यानंतर तिने प्रामाणिकपणे सांगितले. नुडल्स आणि मंच्युरियन खाल्ल्याचे सांगताच तिच्या वडिलांनी तिला रागावले. मात्र याच गोष्टीचा भूमिकेला संताप आला.रागाच्या भारात तिने घरात ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी भूमिका झोपेतून न उठल्याने तिच्या आईने दार ठोठावले. मात्र आतून काहीच प्रतिसाड मिळाला नाही. दोघांनी दरवाजा तोडला. भूमिका गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. या घटनेची पोलिसांना फोन करून माहिती दिली. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.