नागपूर: शहरातील बजाजनगर पोलीस ठाण्यात शिंदेसेनेतील एक पदाधिकारी आणि संपर्क प्रमुखाविरोधात विनयभंग आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिला उद्योजिकेने तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई झाली आहे. तक्रारीनुसार, या पदाधिकाऱ्याने सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मंगेश विजय काशीकर (राहणार शंकरनगर) असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिला एक व्यावसायिक असून, तिची काशीकरशी सुमारे दोन वर्षांपूर्वी एका परिचितामार्फत ओळख झाली होती. काशीकरचे बजाजनगर येथे एक हॉटेल असून, ते हॉटेल महिलेने चालवावे आणि केवळ १० टक्के नफा काशीकरला द्यावा, अशी अट ठेवण्यात आली होती.
महिलेने त्यावर विश्वास ठेवून कर्ज काढून हॉटेल नूतनीकरणासाठी दीड कोटी रुपये गुंतवले. मात्र या व्यवहाराबाबत कोणताही लेखी करार करण्यात आला नव्हता. नंतर जेव्हा महिलेला शंका आली तेव्हा तिने विचारणा केली, परंतु काशीकरने उत्तर देण्याचे टाळले. विशेष म्हणजे हॉटेलची मालकी काशीकरकडे नसून, ती जागा दुसऱ्याच्या नावे असल्याचे उघड झाले.
महिलेने काही काळ काशीकरला ठरलेली १० टक्के नफ्याची रक्कमही दिली होती. पण त्यानंतर काशीकरने वाद घालण्यास सुरुवात केली आणि अधिक पैसे मागून हॉटेल बंद करण्याची धमकी दिली. जेव्हा महिलेने शांततेने व्यवहार करण्यास सांगितले, तेव्हा काशीकरने तिला आणि तिच्या कुटुंबीयांना पिस्तुल दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच राजकीय ओळखीचा गैरवापर करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही दिली.
तक्रारीनुसार, काशीकरने संबंधित महिलेसोबत अश्लील वर्तन केले आणि तिचा विनयभंग केला. या सर्व प्रकारांनंतर महिलेला पोलिसांकडे धाव घ्यावी लागली. पोलिसांनी काशीकरविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.