Published On : Thu, Jun 18th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात अस्सल नोटांच्या गड्ड्यांतून सुरू होता बनावट नोटांचा काळाबाजार; गुन्हे शाखेकडून पर्दाफाश !

Advertisement

नागपूर : शहरातील आर्थिक व्यवहारांना सुरुंग लावणाऱ्या बनावट चलनाच्या एका मोठ्या रॅकेटचा नागपूर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. अस्सल नोटांच्या गड्ड्यांमध्ये बनावट नोटा मिसळून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीवर बुधवारी रात्री धडक कारवाई करण्यात आली. हसनबाग परिसरातील एका घरावर टाकलेल्या छाप्यात लाखो रुपयांच्या जाली नोटा जप्त करण्यात आल्या असून दोन मुख्य आरोपींसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखेला या रॅकेटबाबत काही दिवसांपासून गुप्त माहिती मिळत होती. शहरात मोठ्या रोख व्यवहारांच्या माध्यमातून बनावट चलन खपवले जात असल्याचे संकेत मिळाल्यानंतर युनिट-३, युनिट-४ आणि युनिट-५ यांनी संयुक्तरीत्या सापळा रचला. बुधवारी रात्री हसनबाग येथील परवेज उर्फ पप्पू पटेल यांच्या निवासस्थानी छापा टाकताच या संपूर्ण कारस्थानाचा भांडाफोड झाला. तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी मोठ्या रकमांच्या व्यवहारांमध्ये अस्सल नोटांच्या गड्ड्यांमध्ये अत्यंत हुशारीने बनावट नोटा मिसळत होते. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तींना फसवणुकीची जाणीव होईपर्यंत आरोपी गायब होत असत. या पद्धतीने अनेकांना गंडा घालण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. छापेमारीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटांची संख्या आणि त्यांची एकूण किंमत याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी जप्तीची रक्कम लाखोंमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. या नोटा कुठे छापल्या गेल्या, त्यांचा पुरवठा कोण करत होते आणि त्या शहरासह इतर भागांमध्ये कितपत खपवण्यात आल्या, याचा तपास आता वेगाने सुरू आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील मुख्य आरोपी परवेज उर्फ पप्पू पटेल याचे नाव यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांमध्ये समोर आले आहे. २०२३ मध्ये खंडणीच्या गाजलेल्या प्रकरणात त्याला अटक झाली होती. त्याच काळात एटीएसनेही त्याच्या घराची झडती घेतली होती. त्यामुळे बनावट चलनाच्या या नव्या प्रकरणाने त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

सध्या नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून गुन्हे शाखेची पथके या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. बनावट चलनाचा हा खेळ नेमका किती मोठा आहे, याचा उलगडा पुढील तपासात होण्याची शक्यता असून या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.