Published On : Sun, May 17th, 2020

मेयोतील 270 सफाई कर्मचार्‍यांना अडीच महिन्यांपासून वेतन नाही

Advertisement

बावनकुळेंनी अधिष्ठात्यांचे लक्ष वेधले समस्यांकडे

नागपूर: मेयो इस्पितळात एकूण 270 सफाई कर्मचारी आणि वॉर्ड बॉय कार्यरत आहेत. पण लॉकडाऊन सुरु झाल्यापासून सुमारे अडीच महिने झाले तरी या कर्मचार्‍यांना बीव्हीजी या कंपनीने या कर्मचार्‍यांना वेतन दिले नाही. या कर्मचार्‍यांना त्वरित वेतन मिळावे अशी मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असून मेयोच्या अधिष्ठात्यांचे या समस्येकडे लक्ष वेधले आहे.

आज सकाळी मेयोतील या कर्मचार्‍यांनी वेतन मिळाले नाही म्हणून आंदोलन केले व माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी बावनकुळे यांनी या कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. बीव्हीजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला सफाईचे कंत्राट मिळाले आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे 14500 रुपये किमान वेतन मिळणे बंधनकारक आहे. पण या सफाई कामगारांना फक्त 8 हजार रुपये वेतन देण्यात येत आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावमध्ये या कर्मचार्‍यांनी सफाईचे काम केले आहे. या प्रत्येक कामगाराचा 50 लाख रुपयांचाच विमा काढण्याचे केंद्र शासनाचे निर्देश असताना या कर्मचार्‍यांचा विमा काढण्यात आला नाही. तसेच बीव्हीजी या कंपनीच्या सुपरवायझरकडून महिला कर्मचार्‍यांना अभद्र वागणूक दिली जात असल्याचा आरोपही या पत्रातून करण्यात आला आहे. या कर्मचार्‍यांचे ईएसआयसीचे कार्डही अजूनपर्यंत देण्यात आले नाही.

कर्मचार्‍यांची संघटना तयार केली तर कामावरून कमी करण्याची धमकी दिली जाते. याशिवाय वेतनाचे पत्रकही दिले जात नाही, या तक्रारी कर्मचार्‍यांनी बावनकुळे यांच्याकडे केल्या आहेत.

मेयोच्या अधिष्ठात्यांनी या समस्यांकडे लक्ष देऊन कर्मचार्‍यांच्या या समस्या त्वरित सोडवाव्या अशी विनंती एका पत्रातून अधिष्ठात्यांना केली आहे.