Published On : Thu, May 3rd, 2018

नागपूर मेट्रोच्या खापरी डेपोमध्ये भीषण आगीत करोडो रुपयांचा ‘इंपोर्टेड माल’ जळून खाक

Advertisement

Nagpur Metro, Majhi Metro

नागपूर: सध्या ‘माझी मेट्रो’ चा लूक, जॉय राईड आणि गोष्टींबद्दल नागपूरकरांमध्ये कुतूहल आहे. या १ मे पासून नागपूर मेट्रोचा ५ किमीचा टप्पा सुरु करण्यात आला. मात्र याच दिवशी मध्यरात्री १२ वाजता मेट्रोच्या खापरी स्थित डेपोमध्ये आग लागली असून यामध्ये करोडो रुपयांचा माल जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मेट्रोचे काम पाहणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर कंपनीने (राही) याप्रकरणी अपघाताने आग लागल्याची तक्रार सोनेगाव पोलिसांत दिली आहे. परंतु या बाबीला दोन दिवस उलटले असताना देखील कोणत्याही मुद्रित अथवा इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमाने या घटनेची दखल घेतलेली नाही. त्यामुळे विम्याची रक्कम हडपण्यासाठी ही आग मुद्दाम तर लावण्यात आली नाही ना, असा प्रश्न निर्माण होत असून नक्कीच काहीतरी गैरप्रकार घडल्याचा व त्यामुळेच हे प्रकरण दडपण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.

यासंदर्भात मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी अखिलेश हळवे यांच्यांशी संपर्क साधला असता त्यांनी मंगळवारी मध्यरात्री खापरी डेपो मध्ये लागलेल्या या आगीत २.३० ते ३ कोटींच्या लोखंडी आणि इंपोर्टेड रबर प्लेट जळाल्याचे सांगितले. ही आग विजेमुळे स्पार्क झाल्याने लागल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी रात्री ढगाळ वातावरण होते आणि विजा देखील चमकत होत्या. त्यात मेट्रोच्या रुळांवर लावण्यात येणारे हे रबर पॅड ज्वलनशील असल्याने तसेच सोसाट्याचा वारा असल्याने आग भडकली असे हळवे म्हणाले. तर याउलट मेट्रोच्या खापरी डेपो परिसरात मंगळवारी रात्री १२ वाजता आग लागून तब्बल ८ कोटींचे रबर पॅड जळाल्याची माहिती सोनेगाव स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक संजय पांडे यांनी दिली. मात्र त्यांच्यामते सदर पॅड हे उघड्यावर ठेवले होते तर मेट्रोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनुसार मात्र रबर पॅड शेडमध्ये झाकून ठेवण्यात आले होते.

“अग्निशमन विभागाच्या ३ गाड्या तर विमानतळ विकास प्राधिकरणाची १ गाडी यांनी मिळून तब्बल ९-१० टँकर पाण्याचा सतत मारा केल्यानंतर पहाटेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. फायर कंट्रोल रूमला रात्री १.२४ वाजता मिहान खापरी डेपो येथे आग लागल्याची सूचना मिळाली.” तसेच आगीत जळालेल्या लोखंडी प्लेट आणि इंपोर्टेड रबर प्लेट उघड्यावर ठेवण्यात आल्या होत्या आणि त्यासभोवती टिनेचे कुंपण लावण्यात आल्याची माहिती नरेंद्रनगर अग्निशमन विभागाचे प्रमुख नकोड यांनी दिली.

कॉन्ट्रॅक्टर कंपनीचा संपर्क क्रमांक देण्याबद्दल विचारणा केली असता अखिलेश हळवे यांनी नंबर देण्याचे आश्वासन दिले. परंतु दुसऱ्यांदा फोन केल्यावर त्यांनी, “मीच हवी ती माहिती काढून सांगतो” असे मोघम उत्तर दिले. त्यामुळे सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. किंवा त्यांच्यातर्फे माहितीही मिळू शकली नाही.

सदर घटनेची माहिती केंद्रीय जनविकास पार्टीचे महाराष्ट्र महासचिव चेतन राजकारणे यांनी ‘नागपूर टुडेला’ सर्वप्रथम दिली. याप्रकरणी खूप मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असून याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. खापरी ते विमानतळ हा ५ किमीच्या मार्गावर मेट्रोच्या सेवेला सुरुवात झाली असताना इंपोर्टेड मटेरियल अपघाताने जळाल्याचा देखावा करून तसेच या प्रकरणाची वाच्यता प्रसारमाध्यमांमध्ये होऊ न देता विम्याची रक्कम लाटण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर कपंनी आणि मेट्रो प्रशासनाने ही युक्ती केल्याची चर्चा आहे.

—Swapnil Bhogekar