Published On : Mon, Apr 6th, 2020

महत्त्वाचा कालावधी सुरू, लॉकडाऊन यशस्वी करा : सिंगला

– जिल्हयाबाहेरून आलेल्या लोकांची माहिती प्रशासनाला कळवा

गडचिरोली : गडचिरोली जिल्हयात एकही कोरोना रूग्ण नसला तरी जिल्हयात लॉकडाऊन यशस्वी करा असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. राज्यासह देशातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या यामुळे प्रशासन सर्व स्तरावर सतर्क आहे. लोकांनी जिल्हयाबाहेरून आलेल्या लोकांबाबत माहिती द्यावी जेनेकरून त्यांना विलगीकरणात ठेवता येईल. सद्या वेगवेगळया ठिकाणाहून प्रवास केलेल्या लोकांची प्रशासनाकडून माहिती घेवून लक्षणे असल्यास तपासणी केली जात आहे. आत्तापर्यंत जिल्हयात ३४ नमुने तपासणी केले, त्यातील २६ निगेटीव्ह आले आहेत तर ८ अहवाल अजून येणे बाकी आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांनूसार प्रशासन नमुने तपासणीसाठी पाठवित असते. या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध लक्षणे असलेल्या ३४ लोकांचे आत्तापर्यंत नमुने घेणेत आले.

राज्यभरात आत्तापर्यंत परदेशातून आलेल्या लोकांना क्वारंटाईन केले गेले. यातील बाधित रूग्ण समोर आले. आता त्यांच्या सानिध्यात आलेल्या लोकांना व प्रवासात त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांना क्वारंटाईन केले जात आहे. यातून प्रत्येक ठिकाणी काही प्रमाणात नमुने पॉझीटीव्ह येत आहेत. अशा प्रकारे पॉझीटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेले लोक जर बाहेर पडले तर संसर्ग होण्याची शक्यता नाकरता येत नाही. जरी जिल्हयात अजून पॉझीटीव्ह रूग्ण नसला तरी बाधित व्यक्तीच्या प्रवासातील संपर्कात आलेली व्यक्ती क्वारंटाईनमध्ये असणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जिल्हयात संचार बंदी परिणामकारक राबविण्यात येत आहे. जिल्हयातील जनतेनेही यासाठी सहकार्य करून अकारण गर्दी टाळावी. बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर आरोग्य विभागाबरोबर लोकांचीही नजर असणे गरजेचे आहे.

*गरज असेल तरच बाहेर पडा* : किराणा दुकाने, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी प्रशासनाकडून वेळेची मर्यादा सकाळी ७ ते दुपारी १ अशी करण्यात आली आहे. याचे कारण जिल्हयात संचार बंदी लागू करूनही अकारण फिरणा-यांची संख्या मोठया प्रमाणात होती. जीवनावश्यक वस्तू मुबलक स्वरूपात जिल्हयात उपलब्ध केल्या जात आहेत. याबाबत कोणीही काळजी करण्याचे कारण नाही. तसेच संचार बंदी यशस्वी करून सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. जर आपण लॉकडाऊन यशस्वी केले तर निश्चितच संसर्गावर विजय मिळवू. प्रशासन संचार बंदी यशस्वी होण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवित आहे. कोणतेही कारणे सांगून अकारण बाहेर फिरणे टाळावे अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.

*जिल्हयात आत्तापर्यंत बाहेरून आलेल्या १६५४४ लोकांची नोंद* : जिल्हयात जिल्हयाबाहेरून आलेल्या १६५४४ लोकांची नोंदणी झालेली आहे. यातील सर्वच लोकांना होम तसेच संसथात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. यातील ५३० लोकांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्णही झाला आहे. मात्र उर्वरीत सर्व लोकांनी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडू नये. आरोग्य विषयक तातडीने गरज असल्यास प्रशासनाला कळवा असे आवाहन करण्यात येत आहे. जिल्हयाबाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची नोंद प्रशासनाला देणे गरजेचे आहे. यासाठी जनतेने आपल्या परिसरात बाहेरून आलेल्या लोकांची माहिती प्रशासनाला तातडीने कळवावी.