Published On : Wed, Jul 28th, 2021

श्रीगणेशाच्या पीओपी मूर्तींची निर्मिती, आयात आणि विक्रीवर बंदी संदर्भात आदेशाची अंमलबजावणी करा

आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन यांचे निर्देश

नागपूर: गणेशोत्वाला जवळपास महिनाभर वेळ आहे. अशामध्ये श्रीगणेशाच्या मूर्तींची कारागिरांकडून निर्मिती सुरू झालेली आहे. केंद्र शासनाने श्रीगणेशाच्या पीओपी मूर्तींवर बंदी जाहीर केलेली आहे. त्यानुसार नागपूर शहरामध्ये कुठेही श्रीगणेशाच्या पीओपी मूर्तींची निर्मिती, आयात व विक्री होउ नये यासंदर्भात केंद्राच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी, यादृष्टीने तातडीने आवश्यक कार्यवाही सुरू करा, असे निर्देश आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन यांनी दिले.

गणेश चतुर्थीच्या पूर्वी पीओपी मूर्तींच्या प्रतिबंधासंदर्भात आरोग्य समिती सभापतींनी मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये बुधवारी (ता.२८) विशेष बैठक घेतली. बैठकीत समिती सभापती महेश (संजय) महाजन यांच्यासह उपसभापती विक्रम ग्वालबंशी, समिती सदस्य नागेश मानकर, सदस्या भावना लोणारे, ममता सहारे, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन राजेश भगत, उपायुक्त (स्थावर विभाग) विजय देशमुख, नोडल अधिकारी (स्वच्छता) डॉ.गजेंद्र महल्ले, स्थावर अधिकारी राजेंद्र अंबारे, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे आदी उपस्थित होते.

यावेळी आरोग्य समिती सभापतींनी यापूर्वी मनपाद्वारे पीओपी मूर्ती संदर्भात करण्यात येणा-या कार्यवाहीचा आढावा घेतला. केंद्र सरकारद्वारे पीओपी मूर्तीवर बंदी आणल्यानंतर मूर्ती विक्रेत्यांद्वारे न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली. जनभावना लक्षात घेता मा. न्यायालयाद्वारे पीओपी मूर्ती विक्री संदर्भात महत्वाचे आदेश निर्गमित करण्यात आले. त्यानुसार पीओपी मूर्ती विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानापुढे ‘इथे पीओपी मूर्ती विक्री केली जाते’ असे बॅनर लावणे अनिवार्य करण्यात आले होते. तसेच पीओपी मूर्तीची ओळख व्हावी यासाठी मूर्तीच्या मागील बाजूस लाल खूण करण्याचे अनिवार्य करण्यात आले होते. त्यानुसार मनपाद्वारे मा.न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन राजेश भगत यांनी दिली.

पीओपी मूर्तींवर आता केंद्र शासनाद्वारे पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे शहरात कुठेही या मूर्तींची उपलब्धता होउ नये यादृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करावी. पीओपी मूर्ती न वापराबाबत शहरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी. याशिवाय शहरामध्ये पीओपी मूर्ती कुठल्याही मार्गाने दाखल होउ नये यासाठी पोलिस विभागाला नाकेबंदी संबंधी पत्र देण्यात यावे. त्यानुसार पोलिस विभागाच्या सहकार्याने नाकेबंदी करून पीओपी मूर्ती शहरात दाखल होण्यापासून थांबवावे. याशिवाय मूर्ती विक्रेत्यांना पीओपी मूर्ती विक्री न करण्याचे आवाहन करण्यात यावे. यानंतरही पीओपी मूर्तीची विक्री होत असल्यास संबंधित विक्रेत्यावर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन यांनी दिले.

प्रशासनाद्वारे पीओपी मूर्ती प्रतिबंधासंदर्भात तातडीने जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मनपा आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांचे पथक निर्धारित करण्यात येत आहे. या पथकाद्वारे आतापासूनच मूर्ती विक्रेत्यांकडे जाउन त्यांना पीओपी मूर्ती विक्री न करणे व केल्यास मनपाद्वारे सर्व मूर्ती जप्त करून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात येणार आहे, असे उपायुक्त राजेश भगत यांनी सांगितले.

आरोग्य समिती उपसभापती विक्रम ग्वालबंशी यांनी श्रीगणेशाच्या मूर्तीचे तलावात विसर्जन होउ नये यासाठी कृत्रिम टाक्यांचे निर्माण करताना नगरसेवकांकडून विसर्जन स्थळांची माहिती मागविण्यात यावी, अशी सूचना केली. समिती सदस्य नागेश मानकर यांनी पीओपी मूर्ती प्रतिबंधासंदर्भात घराघरातून कचरा संकलन करणा-या वाहनांवरही जनजागृती संदेश प्रसारीत करण्याची सूचना केली. या सर्व सूचनांवर अंमलबजावणी करण्याचे निर्देश समिती सभापतींनी प्रशासनाला दिले.