नागपूर : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. ठिकठिकणी आंदोलन चिघळले असून जाळपोळ दगडफेक सारख्या घटना घडत आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद नागपुरातही पाहायला मिळत आहे. आज नागपुरात मराठा समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन सामूहिक आंदोलन केले.
यादरम्यान समाजातील नागरिकांनी सामूहिक मुंडन करत सरकारचा निषेध केला. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर असून सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलकांकडून वेगवेगळ्या युक्त्या लढवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासाठी एक समितीही गठित करण्यात आली आहे. मात्र, ३० ऑक्टोबर रोजी या आंदोलनाने हिंसक रूप धारण केले. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठवाड्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाळपोळ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी यावर प्रतिक्रिया देत मराठा समाजाने शांततेत आंदोलन पार पाडावे असे म्हटले आहे.
दरम्यान तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारने आज दिवसभरात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय जाहीर न केल्यास पाणीत्याग करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मराठा आंदोलन आणखीनच तापण्याची शक्यता आहे.