Published On : Mon, Dec 17th, 2018

गोवर-रूबेलाच्या उच्चाटणासाठी जनजागृती रथ बजावणार महत्त्वाची भूमिका

लसीकरण जनजागृती रथाला महापौर नंदा जिचकार यांनी दाखविली हिरवी झेंडी

नागपूर: गोवर रूबेलाच्या उच्चाटनासाठी शासनाने गांभीर्याने घेतले असून सर्वत्र गोवर-रूबेला लसीकरणाचा प्रचार प्रसार होत आहे. मात्र अनेक ठिकाणी अफवा पसरवून या मोहिमेमध्ये अडसर निर्माण करून चिमुकल्या जीवांशी खेळ होत आहे. असाच प्रकार शहरामध्येही सुरू असून गल्लोगल्ली जाउन गोवर-रूबेला लसीकरणाची जनजागृती करण्यामध्ये जनजागृती रथ महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.

गोवर-रूबेलाच्या उच्चाटनासाठी लॉयन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३२३४एच१ यांनी क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्‍हर्नर सुनील व्‍होरा यांच्या मार्गदर्शनात नागपूर महानगरपालिकेला सहकार्य करीत जनजागृतीसाठी रथ उपलब्ध करून दिला. या रथाला महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी (ता.१७) हिरवी झेंडी दाखविली.


यावेळी विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, शिवसेना गटनेता किशोर कुमेरिया, सत्ता पक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, अग्निशमन व विद्युत विशेष समितीचे सभापती लहुकुमार बेहेते, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, निशांत गांधी, मनोज सांगोळे, भगवान मेंढे, नगरसेविका शिल्पा धोटे, वनिता दांडेकर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी, अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, रंजना लाडे, सहायक आयुक्त विजय हुमने, मनपा आरोग्य उपसंचालक डॉ. ए.बी. तुमाने, नोडल अधिकारी डॉ. सुनील घुरडे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, लॉयन्स क्लबचे गोवर-रूबेला जनजागृतीचे विदर्भ समन्वयक लॉयन बलबीर सिंह वीज, माजी डिस्ट्रीक्ट गव्‍हर्नर लॉयन चंद्रकांत सोनटक्के, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. दीपकंर भिवगडे, डॉ. उमेश मोवाडे, समन्वयक दीपाली नागरे, सहायक अधिक्षक पी.बी. शेवारे, दिलीप तांदळे आदी उपस्थित होते.

महापौर पुढे म्हणाल्या, ९ ते १५ वर्ष वयोगटातील मुले व मुलींना गोवर-रूबेलाची लस देणे आवश्यक आहे. त्यांच्या सुदृढ भविष्यासाठी ही अत्यंत आवश्यक बाब असून प्रत्येक पालकाने पुढाकार घेउन पाल्यांना लस देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. लसीकरणासंदर्भात अनेक गैरसमज पसरविण्यात येत आहेत. त्यामुळे भीतीपोटी अनेक मुले लसीकरणाविनाच आहेत. त्यांच्या भविष्याचा विचार करून अफवांना बळी न पडता प्रत्येक मुले व मुलीला लस देण्याचे आवाहनही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी केले.

मनपा मुख्यालयात महापौरांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना झालेला गोवर-रूबेला लसीकरण जनजागृती रथ संपूर्ण विदर्भात फिरून जनजागृती करणार आहे. रथावर असलेल्या एलईडी स्क्रीनवरून लसीकरणाबाबत पसरविण्यात आलेल्या अफवा व त्यांचे खंडण करून वास्तव दर्शविणारे व्‍हीडीओ दाखविण्यात येणार आहे. याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवर व्‍यक्तींकडून जनजागृतीसाठी देण्यात येणारे संदेशही या रथाद्वारे दाखविण्यात येणार आहे. नागपूर शहरात चार दिवस रथ शहरातील शहरी व ग्रामीण भागात फिरून जनजागृती करणार आहे. ज्या भागामध्ये लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे, त्या भागात जाउन तेथील नागरिकांना लसीकरणाचे महत्व पटवून देण्याचे काम या जनजागृती रथाद्वारे होणार आहे.