नागपूर : मुंबईमध्ये सोमवारी पावसाने आणि वादळी वाऱ्याने भीषण थैमान घातले. या वादळी वाऱ्याचा मोठा फटका मुंबईकरांना बसला.वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर मोठे होर्डिंग कोसळले. या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो जण जखमी झाले आहेत.दुर्घटनेनंतर नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेल्या मोठ्या अवैध होर्डिंग्ज मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
नागपुरात घाटकोपरसारखी घटना घडू नये म्हणून सर्व मोठे होर्डिंगज तात्काळ हटवण्याची मागणी भारतीय जनता पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेससह विविध सामाजिक संघटनाच्यावतीने महापालिकेकडे करण्यात आली.
नागपूरच्या विविध भागात अवैध होर्डिंग दिसत आहे. यामुळे येत्या काळात कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून भाजप नेते आणि व महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ हटवण्यात यावे अशी मागणी महापालिकेचे आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांच्याकडे केली आहे.
भाजपसोबतच शरद पवारगटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण पश्चिमतर्फे शहरातील मोठे होर्डींग तात्काळ हटविण्याची मागणी आयुक्ताकडे केली आहे. याबाबतचे निवेदन प्रदेश सरचिटणीस दिलीप पनकुले यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिले.