
नागपूर : शहरातील इमामवाडा पोलिसांनी गस्तीदरम्यान सतर्कता दाखवत दोन दुचाकी चोरी प्रकरणांचा उलगडा केला असून कायद्याशी संघर्ष करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
२ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० ते ३ फेब्रुवारी रोजी पहाटे १२.३० या कालावधीत रामबाग, इमामवाडा येथील ३७ वर्षीय अक्षलेश विजय वंजारी यांनी त्यांच्या घराबाहेर, जयंती मैदान परिसरातून त्यांची होंडा अॅक्टिव्हा (एमएच-४९-एएन-०३६२) ही सुमारे २० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली होती. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास सुरू असताना पोलिस पथक गस्त घालत असताना संशयास्पद हालचाल करणारा एक तरुण तपकिरी रंगाची होंडा अॅक्टिव्हा चालवत असल्याचे आढळले. त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. चौकशीत तो अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले.
सखोल चौकशीत त्याने जयंती मैदान येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पुढील तपासात त्याने इमामवाडा हद्दीतील जटारोडी परिसरात कस्तुरबा शाळेमागून आणखी एक करड्या रंगाची होंडा अॅक्टिव्हा (एमएच-४९-एडब्ल्यू-९३२२) चोरी केल्याचेही उघड झाले. पोलिसांनी दोन्ही चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे ५० हजार रुपये असल्याचे सांगितले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त रश्मिता राव (झोन ४) व सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जयवंत पाटील, गणेश पवार, आदित्य मडावी, शैलेश ठवरे, चंद्रशेखर कोरटी, संदीप बोरसरे, रणजित आणि जितेंद्र चौधरी यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास सुरू आहे.








