Published On : Fri, Nov 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात घरातूनच गुटख्याचा अवैध साठा जप्त; बेडरूम आणि स्टोअर रूममध्ये लपवला होता लाखोंचा माल

कलमना पोलिसांची छापेमारी; २ लाख २३ हजार ५०३ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा-पान मसाला जप्त
Advertisement

नागपुरात घरातूनच गुटख्याचा अवैध साठा जप्त; बेडरूम आणि स्टोअर रूममध्ये लपवला होता लाखोंचा माल

नागपूर : प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पान मसाल्याची अवैध विक्री करणाऱ्यांविरोधात नागपूर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. कलमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एस्कॉर्ट पथकाने एका घरावर छापा टाकून तब्बल २ लाख २३ हजार ५०३ रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. विशेष म्हणजे, हा माल आरोपीने घरातील बेडरूम आणि स्टोअर रूममध्ये लपवून ठेवला होता.

५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी एस्कॉर्ट पथक गस्तीवर असताना पोलिसांना जुन्या कामठी रोडवरील न्यू ओम साई नगर परिसरात प्रतिबंधित गुटख्याचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी प्लॉट क्रमांक १६ आणि १७ येथील लखन चतरो छाडी (३५) याच्या घरी छापा टाकला. घराची झडती घेतली असता विविध कंपन्यांचा गुटखा आणि सुगंधित पान मसाला आढळून आला.

आर्थिक फायद्यासाठी विक्रीच्या उद्देशाने हा साठा जमा केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त रविना बबन नागले यांच्या तक्रारीवरून कलमना पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त मुद्देमालासह आरोपीला पुढील कारवाईसाठी कलमना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिषेक बागडे आणि एस्कॉर्ट पथकाने ही कारवाई केली. जप्त गुटखा नेमका कुठून आणला होता आणि त्याची विक्री कोणाला केली जाणार होती, याचा पोलीस तपास करत आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.