| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jul 17th, 2019
  maharashtra news | By Nagpur Today Nagpur News

  हिम्मत असेल तर शिवसेनेने ‘वर्षा’वर मोर्चा काढावा!: विजय वडेट्टीवार

  शेतकऱ्यांसाठी नाही तर मतांसाठी शिवसेनेचा मोर्चा.

  पीकविमा प्रश्नावर शिवसेनेने मुंबईत काढलेला मोर्चा हा शेतकरी हितासाठी नसून मतासाठी आहे, अशी घणाघाती टीका करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, हिम्मत असेल तर शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा काढावा, असे आव्हान दिले.

  शिवसेनेच्या मोर्चावर प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, शिवसेनेने मुंबईत काढलेल्या मोर्चात एकही शेतकरी नव्हता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतासाठी या मोर्चाचा देखावा करण्यात आला आहे. सत्तेत राहून शिवसेनेला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता आले नाहीत.सत्तेत राहून सत्तेच्या विरोधात शिवसेना मोर्चा कसला काढते ? प्रश्न सुटत नसतील तर मुख्यमंत्र्यांना जाब विचारला पाहिजे. पण त्यांचे मंत्री गप्प बसताता आणि मोर्चासारखी नौटंकी करतात. देणारे तुम्हीच असताना प्रश्न कोणाला विचारता, असा टोला त्यांनी लगावला. सत्तेत राहून प्रश्न सोडवता येत नसतील तर सत्तेला लाथ मारा आणि मग रस्त्यावर उतरा.

  पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक कशी करतात ? शेतकऱ्यांना लुबाडून स्वतःचे खिसे कसे भरतात?हे पुराव्यानिशी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारच्या निर्दशनाला आणून दिले, तेव्हा शिवसेनेचा एकही मंत्री बोलला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रस्नावर काढलेला मोर्चा ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका असल्याचे दिसत आहे. शिवसेनेला शेतकऱ्यांचा खरेच कळवळा असता तर सत्तेचा आसूड वापरून पीकवीमा कंपन्यांना सरळ केले असते आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला असता, असेही वडेट्टीवार म्हणाले.

  विमा कंपन्यांचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. केंद्रातही शिवसेना सत्तेत सहभागी आहे आणि आता संसदेचे अधिवेशन सुरु आहे. शेतकऱ्यांना नाडवणाऱ्या विमा कंपन्यांवर कारवाई करण्यास शिवसेना केंद्र सरकारला भाग पाडू शकते, त्यासाठी त्यांच्या हातात संसदीय आयुधे आहेत. मात्र प्रत्यक्ष या प्रश्नी कोणताही मुद्दा, निषेध वा चर्चा संसदेत न करता केवळ लोकभावनेशी शिवसेना खेळत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145