Published On : Wed, Mar 31st, 2021

बँक सुस्थीतीत राहीली तर संस्था टिकतील – फुंडे

Advertisement

– जिल्हा बँकेची प्रथमच ऑनलाईन आमसभा,बँकेचा निव्वळ नफा २ कोटी ४१ लाख रुपये

भंडारा : भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सर्वसामान्यांची बँक आहे. तिचा विकास करणे, बँकेला यशाच्या शिखरावर नेणे सर्वांची सयुक्त जबाबदारी आहे. त्यासाठी सर्वांनी मिळुन सामुहिक प्रयत्न केले पाहिजेत. संस्था टिकवायच्या असतील तर बँक सुस्थीतीत राहीली पाहिजे, असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी व्यक्त केले. यावेळी ते ऑनलाईन आमसभेला मार्गदर्शन करीत होते. कोरोना महामारीमुळे प्रशासनाने घालुन दिलेल्या नियमामुळे नागरिकांना एकत्र येण्यावर बंदी घातली असल्यामुळे जिल्हा बँकेची वार्षीक आमसभा प्रथमच ऑनलाईन घेण्यात आली. जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात दि. ३० मार्च २०२१ रोजी ऑनलाईन आमसभा घेण्यात आली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे हे आमसभेला मार्गदर्शन करीत होते.

प्रथमच पार पडलेल्या आमसभेला काँग्रेसचे माजी आ. आनंदराव वंजारी, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, व बँकेचे सर्व संचालक, सरव्यवस्थापक संजय बुरडे उपस्थित होते. ऑनलाईन आमसभा घेण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयात तुमसर येथील जिल्हा बँकेच्या शाखेतील एफएलसी, मोहाडी तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत, बाजार समिती लाखनी, जंगल कामगार संस्था साकोली, पवनी येथे जिल्हा बँकेच्या शाखेतील एफएलसी सेंटर व लाखांदुर येथे एआर कार्यालय येथे ऑनलाईन सेंटर देण्यात आले होते. या सर्वच सेंटरवर पालक संचालकांनी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात सभासदांची उपस्थिती दर्शवीली होती.

जिल्हा बँकेवर सुनील फुंडे विराजमान झाले तेव्हापासुन तब्बल १६ वर्षापासुन जिल्हा मध्यवर्ती बँक सतत निव्वळ नफ्यात आहे. चालुवर्षी बँकेला रु. १९५४.५३ लक्ष ढोबळ नफा झाला असुन त्यापैकी रु. २४१.८० लक्ष निव्वळ नफा झाला आहे. भंडारा, साकोली, पवनी व तुमसर या ठिकाणी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी आर्थिक साक्षरता केंद्र स्थापन करण्यात आले आहे. बँकेला सन २०२०-२१ या वर्षात शासनाकडुन २६० कोटी रुपयाचे पिक कर्ज वाटपाचे उदीष्टय देण्यात आले होते. दि. ३० सप्टेंबर २०२० पर्यंत बँकेने ७४ हजार ७११ सभासदांना ३१४१५.६४ लक्ष रुपयाचे पिक कर्ज वाटप केलेले आहे.

बँकेने आतापर्यंत केलेले संपुर्ण कर्ज वाटप बँकेच्या स्वनिधीमधुन केले आहे. सन २०२१-२२ च्या खरीप हंगामासाठी शासनाकडुन २८०.७८ कोटीचे लक्षांक प्राप्त झाले आहे. दि. ३१ मार्च २०२० ला बँकेत २६२ कर्मचारी आकृतीबंधाप्रमाणे कार्यरत आहेत. त्यामुळे कर्मचार्‍यांवर कामाचा ताण असुनही काही शाखा तोटा समायोजीत केल्यानंतर बँक २४१.८० लक्ष रुपयाने नफ्यात आहे.

प्रत्येक शाख नफ्यात असावी, असा भारतीय रिझर्व्ह बँक/ नाबार्डचा आग्रह असुन त्यासाठी प्रत्येक शाखेत कर्ज, ठेवी व कर्ज पुरवठ्यात वाढ होऊन १०० टक्के वसुली होणे, शाखा जिवंत राहण्यासाठी आवश्यक असल्याचे सुनील फुंडे यांनी ऑनलाईन आमसभेत सांगीतले. या आमसभेत अनेक विषयांना सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आली तसेच आर्थिक वर्षातील जमाखर्चाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. शेवटी सहभोजनाने आमसभेची सांगता करण्यात आली.