मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्रिपदाबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाष्य केले. मला लांगूनचालन करायचे असते तर मी केंद्रात मागच्या आणि आत्ताच्या टर्मलाही मंत्री राहिलो असतो, असे पटोले म्हणाले. मी अनेक खुर्च्या सोडलेला माणूस आहे.
माझ्या नशिबात असेल आणि जे मिळेल त्याला जनतेसाठी उपयुक्त करण्याची माझी क्षमता आहे अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मुख्यमंत्रिपदाबाबत भावना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्रिपद हा निवडणुकीनंतरचा भाग आहे परंतु राज्यातील महायुती सरकारला बाहेर काढणं हे काँग्रेसचा राज्याचा प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे. त्यासाठी या सरकारचा भ्रष्ट कारभार, शिवद्रोही कसे, महाराष्ट्रद्रोही कसे हे जनतेपर्यंत पोहचवणं माझे काम आहे. त्यानंतर ज्येष्ठ नेते बसून मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतील, असेही पटोले म्हणाले.
मी कधीही खुर्चीची लढाई लढली नाही, कायम जनतेची लढाई लढली. त्यामुळे मला फळ काय मिळते यापेक्षा माझा पक्ष कसा मजबूत होईल. महाराष्ट्रातील जनतेला न्याय कसा मिळेल हेच काम मी केले आहे. फळाची चिंता करण्यापेक्षा कर्मावर भरवसा ठेवणारा मी आहे.
मी माझे राजकीय गुरु विलासराव देशमुख यांचा शिष्य आहे. ते मला सांगायचे, वेळेच्या पहिले आणि नशिबाच्या जास्त काही प्राप्त होत नाही. माझ्या नशिबात असेल आणि जे मिळेल त्याला जनतेसाठी उपयुक्त करण्याची माझी क्षमता आहे. आज त्याची काळजी माझ्या डोक्यात न ठेवता महाराष्ट्रातील जनतेला न्याय कसा देतील हे माझे स्वप्न आहे.