मुंबई : राज्य सरकारने त्रिभाषा धोरणात हिंदी सक्तीचा निर्णय अखेर मागे घेतला असून, हा निर्णय कुठल्याही राजकीय दबावामुळे नव्हे तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. “आम्ही कोणत्याही पक्षाच्या मतांपेक्षा महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे कल्याण महत्त्वाचे मानतो. कोणाच्याही दबावाला बळी न पडता, अहंकार न ठेवता शासन निर्णय मागे घेतला,” असे फडणवीस म्हणाले.
भाजपच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी म्हटले की, “उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारण्यात आला होता. त्या अहवालात पहिली ते बारावी हिंदी सक्तीने शिकवण्याची शिफारस होती. ठाकरे सरकारने तो मान्य केला होता, याचे माझ्याकडे पुरावे आहेत.”
दोन भावांनी एकत्र यावं, आम्हाला काही हरकत नाही-
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर फडणवीस यांनी मिश्कील भाष्य करत म्हटले, “मी असा काही जीआर काढलेला नाही की दोन भावांनी एकत्र येऊ नये. ते क्रिकेट, हॉकी, टेनिस काहीही खेळोत, एकत्र जेवोत – आम्हाला काही हरकत नाही.”
‘शिक्षणाचा विषय, अर्थतज्ज्ञ समिती कशी? उद्धव ठाकरे यांचा सवाल-
विधानभवन परिसरात बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टिका करत म्हटले की, “शिक्षणासारख्या संवेदनशील विषयावर समिती अर्थतज्ज्ञांची नेमली आहे, ही थट्टा आहे. आम्ही त्यांच्या बुद्धिमत्तेचा सन्मान करतो, पण शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचीच गरज आहे. मात्र आता हा विषय संपला आहे.”
५ जुलैला विजयी मेळाव्याची घोषणा, मोर्चा रद्द-
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “सरकारने जीआर मागे घेतल्यामुळे ५ जुलैचा मोर्चा रद्द करत आहोत. त्याऐवजी मराठी माणसाच्या ऐक्याचा विजय साजरा करण्यासाठी विजयी मेळावा आयोजित केला जाणार आहे. यामध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल. ही लढाई मराठी भाषेच्या अस्मितेची होती.
पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी सक्ती करण्याचा सरकारचा प्रयत्न होता, तो आम्ही मराठी जनतेच्या ऐक्याने परतवून लावला. ही लढाई आपण जिंकली आहे,” असे म्हणत राज ठाकरे यांनी जनतेचे आभार मानले.मेळाव्याचे ठिकाण व वेळ लवकरच जाहीर होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.