Published On : Sat, May 26th, 2018

ऑडियो क्लिप खरी असेल तर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा : अशोक चव्हाण

पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कथित ऑडिओ क्लिप शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी ऐकवली. त्यानंतर आज या क्लिपवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या ऑडिओ क्लिपबाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ खुलासा करावा. तसेच, क्लिप जर खरी असेल तर मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेतील वाद अजूनच वाढत आहे. याचदरम्यान, शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपमध्ये मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला ‘जशास तसे उत्तर द्यावे’ असे म्हटले होते. साम, दाम, दंड, भेदाचा वापर केला पाहिजे. आपल्याला जर ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही. असे या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले होते.

शिवसेनेने ऑडिओ क्लिप जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ‘निवडणुक आयोगाने याप्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी. क्लिप खरी असेल तर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा. तसेच, जर ही क्लिप खोटी निघाली तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर कारवाई करावी’, असे त्यांनी म्हटले आहे.