नागपूर – काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करणाऱ्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी अंतरिम स्थगिती दिली. मात्र त्या अद्यापही निवडणूक लढणार नाही.रश्मी बर्वे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपा नेत्यांवर सडकून टीका केली.
भाजपाच्या एका बड्या नेत्याने माझे नैतिक वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नागपुरातील भाजपाचा दुसरा मोठा नेता धृतराष्ट्राची भूमिका बजावत दुर्लक्ष करत होता, असा गंभीर आरोप रश्मी बर्वे यांनी कोणाचेही नाव न घेता केला आहे.
भाजपाचा तो मोठा नेता नेहमीच सत्याच्या बाजूने राहतो आणि अन्यायग्रस्तांच्या पाठीशी उभा राहतो अशी त्याची प्रतिमा होती. त्यामुळे मला त्या बड्या नेत्यांपासून मोठी अपेक्षा होती. पण, माझ्या प्रकरणात माझ्यावर अन्याय होत असताना भाजपाचा तो नेता आपल्या पक्षाच्याच बाजूने उभा राहिला. त्यामुळे त्या आंधळ्या, मुक्या आणि बहिऱ्या नेत्यापासून माझा भ्रमनिरास झाल्याचा संताप बर्वे यांनी व्यक्त केला.
नैतिक वस्त्रहरण करणारा भाजपाचा तो नेता कोण? असा सवाल उपस्थित झाला असून राजकीय वर्तुळात उलट-सुलट प्रतिक्रिया उमट आहे.