
नागपूर : रनाळा परिसरात दारू आणि जेवणाच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान महिलेच्या मृत्यूत झाले. पतीने पत्नीचे डोके जमिनीवर आपटल्याचा आरोप असून, या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. ही घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास खानवाणी लेआउट परिसरात घडली.
मृत महिलेचे नाव श्यामवती उमाशंकर वट्टी (६०) असे आहे. श्यामवती आणि त्यांचे पती उमाशंकर वट्टी (६५) हे मूळचे मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील असून, मागील दोन वर्षांपासून रनाळा परिसरात बांधकाम मजूर म्हणून काम करत होते.
रविवारी कामावरून घरी आल्यानंतर श्यामवती स्वयंपाक करत होत्या. दरम्यान, उमाशंकर देशी दारूच्या ९० मिलीच्या दोन बाटल्या घेऊन घरी आला. त्यातील एक बाटली आढळून न आल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद वाढल्यानंतर उमाशंकरने श्यामवती यांचे डोके जमिनीवर आपटल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेवेळी त्यांचा सुमारे १० वर्षांचा नातूही तेथे उपस्थित होता. त्याने आरडाओरड केल्यानंतर शेजारी धावून आले. त्यांनी ठेकेदार रोशन हलमारे यांना घटनेची माहिती दिली. गंभीर जखमी झालेल्या श्यामवती यांना कामठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत उमाशंकर वट्टी याला ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अक्षय झगडे करीत आहेत.




