मुंबई – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात या हल्ल्याचा तीव्र निषेध करत स्पष्ट संदेश दिला. त्यांनी सांगितले की, ही लढाई चांगल्या आणि वाईट प्रवृत्तींची असून, दुष्टांचा नाश करण्यासाठी सामर्थ्य आवश्यक आहे.
मुंबईत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८३व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी देश, धर्म आणि राष्ट्राच्या सुरक्षेवर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “जगभरात जर एखादा खरा धर्म असेल, तर तो म्हणजे मानवता. भारतात यालाच हिंदू धर्म म्हटले जाते. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला.
भागवत यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निष्पाप लोकांना गमवावे लागले, हे अत्यंत वेदनादायक आहे. मात्र, असे हल्ले करणाऱ्यांचा धर्माशी काही संबंध नाही. आपल्या सैनिकांनी कधीही कोणाच्या धर्मावरून भेदभाव केला नाही. पण काल ज्या लोकांनी हे कृत्य केलं, त्यांनी धर्माचा चुकीचा अर्थ लावला आहे,असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, “ही धर्म आणि अधर्म यामधील संघर्ष आहे. असुरी शक्तींचा नायनाट करण्यासाठी देवीच्या रूपातील शक्ती आवश्यक आहे. जसे रामाने रावणाचा अंत केला, तसेच दुष्ट प्रवृत्तींचाही विनाश झाला पाहिजे.
भागवत यांनी देशातील जनतेला एकजूट राहण्याचे आवाहन करत सांगितले, “जेव्हा समाज संघटित होतो, तेव्हा कोणीही आपल्याला कमकुवत समजू शकत नाही. जर कोणी वाईट नजर टाकली, तर ती नजरच नाहीशी केली जाईल.
आपण शांततेचा मार्ग मानणारे आहोत, पण जर गरज भासली, तर आपली ताकदही दाखवली पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रशक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या या ठाम आणि प्रेरणादायी वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये राष्ट्राभिमान जागृत झाल्याचे पाहायला मिळाले.