नागपूर : नागपूरच्या धरमपेठ येथील संजय अग्रवाल यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नांना एचपीसीएल बायोफ्युएल्स लिमिटेडने सविस्तर उत्तर दिले आहे. या आरटीआयमुळे कंपनीच्या बिहारमधील इथेनॉल निर्मिती प्रकल्पांची क्षमता आणि कार्यप्रणालीची माहिती समोर आली आहे.
अग्रवाल यांनी १४ ऑगस्ट २०२६ रोजी दाखल केलेल्या अर्जात कंपनीच्या स्वतःच्या प्रकल्पांचे ठिकाण, प्रकल्पावरील खर्च, उत्पादन क्षमता, इथेनॉल निर्मितीसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल आणि आतापर्यंतच्या उत्पादनाची माहिती मागितली होती.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील सुगौली आणि पश्चिम चंपारण जिल्ह्यातील लौरिया येथे दोन प्रकल्प कार्यरत आहेत. दोन्ही प्रकल्पांची ऊस गाळप क्षमता प्रत्येकी ३५०० टीसीडी, तर इथेनॉल निर्मिती क्षमता प्रत्येकी ६० हजार लिटर प्रतिदिन आहे. याशिवाय प्रत्येक प्रकल्पातून २० मेगावॅट वीज निर्मिती केली जाते.
दोन्ही प्रकल्पांमध्ये इथेनॉल निर्मितीसाठी मळीचा वापर केला जातो. हे प्रकल्प डिसेंबर २०११मध्ये सुरू झाले आहेत.
दरम्यान, प्रकल्पांवरील खर्च आणि वर्षनिहाय उत्पादनाची सविस्तर आकडेवारी कंपनीच्या वार्षिक अहवालांमध्ये उपलब्ध असल्याचे एचपीसीएल बायोफ्युएल्सने आरटीआयच्या उत्तरात स्पष्ट केले आहे. नागपूरमधून दाखल झालेल्या आरटीआयमुळे एचपीसीएलच्या इथेनॉल निर्मितीची क्षमता आणि प्रकल्पांची माहिती सार्वजनिक झाली आहे.





