नागपूर : धरमपेठेतील क्युबा या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या एसएसबीने धाड टाकली आहे. याठिकाणी अल्पवयीन मुलांना हुक्का पुरविण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी संचालक प्रफुल्ल अशोक चौधरी (३८), त्याचा सहकारी प्रणय चंद्रशेखर महाजन (२४. तेलंगखेडी), सूरज संजय निखाडे (२१), तौहीद बशीर शेख (२२) आणि अझहर हुसेन खान (२१) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धरमपेठेतील गोतमारे कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावर चौधरी याचे हुक्का पार्लर आहे. चौधरी सुमारे दोन वर्षांपासून ते चालवत आहेत. यापूर्वीही पोलिसांनी तेथे कारवाई केली होती. कारवाईच्या भीतीने चौधरीने ते तौहीदला भाड्याने दिले आहे.
परिसरातील अल्पवयीन मुले या हुक्का पार्लरमध्ये हुक्का सेवन करण्यासाठी येतात. क्राइम ब्रँचच्या एसएसबीने रविवारी क्युबामध्ये छापेमारी केली. पोलिसांना दोन अल्पवयीन मुले आणि इतर ग्राहक हुक्का ओढताना आढळले. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.