Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Oct 29th, 2020

  सातत्यपूर्ण समर्पीत सेवेचा सन्मान हा गौरवाचा क्षण : महापौर संदीप जोशी

  मनपामध्ये आणखी ११३८ ऐवजदार सफाई कर्मचारी होणार स्थायी : प्रतिकात्मक स्वरूपात १० कर्मचाऱ्यांना स्थायी नियुक्ती आदेशाचे वितरण

  नागपूर : शहराच्या स्वच्छतेसह नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सफाई कर्मचारी अविरत सेवा देत आहेत. त्यांच्या सेवाकार्याचा सन्मान व्हावा, ऐवजदार म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनपामध्ये स्थायी नियुक्ती मिळावी यासाठी अनेक वर्ष केलेल्या प्रयत्नांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने यश मिळाले. त्याचे फलित म्हणून यापूर्वी २ मार्च २०२० रोजी मनपाच्या स्थापना दिनी तब्बल २२०६ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. त्याचा दुसरा टप्पा म्हणून आता ११३८ ऐवजदार सफाई कर्मचारी बांधव आणि भगीनींना स्थायी नियुक्ती आदेश देणे सुरू आहे. आपले शहर स्वच्छ सुंदर असावे, नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी सातत्याने सुरू असलेल्या सेवेचा हा सन्मान आहे. नागपूर शहराची सातत्यपूर्ण समर्पीत भावनेने ऐवजदार सफाई कर्मचारी बांधवांकडून केल्या जाणाऱ्या सेवेचा सन्मान करणे हा मनपातील गौरवाचा क्षण आहे. अनेक वर्ष प्रलंबित असलेला विषय मार्गी लावून ऐवजदारांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करू शकण्यात आपले योगदान असल्याचे समाधान आहे, असे भावोद्गार महापौर संदीप जोशी यांनी काढले.

  नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत ११३८ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी केले जाणार आहे. सोमवारी (ता.२६) महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात दहा झोनमधील ११ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

  मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आयोजित समारंभाच्या अध्यक्षस्थानी महापौर संदीप जोशी होते. यावेळी उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, पशुचिकित्सक अधिकारी गजेंद्र महल्ले, राजेश हाथीबेड, किशोर मोटघरे, राजेश लवारे यांच्यासह दहाही झोनचे विभागीय अधिकारी तसेच स्वास्थ निरीक्षक उपस्थित होते.

  प्रारंभी महापौर संदीप जोशी यांनी प्रतिकात्मक स्वरूपात लक्ष्मीनगर झोनच्या कुसुम मोटघरे, धरमपेठ झोनच्या रेखा चव्हाण, हनुमाननगर झोनचे शरद गजभिये, धंतोली झोनच्या माधुरी मनपिया, नेहरूनगर झोनचे चंद्रदर्शन रंगारी, गांधीबाग झोनचे विशाल तुर्केल, सतरंजीपुरा झोनचे भक्तपाल नंदेश्वर, लकडगंज झोनचे पृथ्वीराम मेश्राम, आसीनगर झोनचे रुक्मिनी माटे, मंगळवारी झोनच्या नंदा देशपांडे आणि शुद्धोधन घुटके या ११ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी नियुक्ती आदेश प्रदान केले.

  पुढे बोलताना महापौर संदीप जोशी म्हणाले, ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. आरोग्याच्या समस्येमुळे अनेक ऐवजदारांचा मृत्यू झाला. त्यांच्या वारसदारांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती मिळावी यासाठी विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विशेष प्रयत्न केले. देवेंद्र फडणवीस महापौर असताना त्यांनी नियमीत सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीचा निर्णय घेतला. पुढे राज्याचे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेक अडथळे दूर करून ऐवजदारांना स्थायी नियुक्तीचा मार्ग मोकळा करून दिला. यासंदर्भात ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना अधिसंख्य सफाई कर्मचारी पदावर नियुक्त करण्यासंबंधात २० सप्टेंबर २०१९ रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य शासनाद्वारे परिपत्रक काढण्यात आले. त्यानुसार ज्या ऐवजदारांची २० वर्षाची सेवा पूर्ण झाली आहे त्यांना स्थायी नियुक्ती प्रदान केली जात आहे.

  यामध्ये पहिल्या टप्प्यात नागपूर महानगरपालिकेमधील एकूण ४३४७ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांपैकी मनपाच्या स्थापना दिनी २ मार्च २०२० रोजी २२०६ कर्मचाऱ्यांना स्थायी नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. यानंतर सेवेची २० वर्ष पूर्ण केलेल्या ११३८ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना आज २६ ऑक्टोबर रोजी स्थायी नियुक्ती आदेश प्रदान केले जात आहेत. पुढे काही दिवसांवरच दिवाळी आहे. दिवाळी हा आनंद देणारा सण आहे. आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी मागील २० वर्षांपासून अवरित सेवा देणाऱ्या या सर्व सफाई कर्मचारी बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद म्हणजे नागपूर शहरासाठी दिलेल्या सेवेची भेट आहे, अशी भावनाही महापौर संदीप जोशी यांनी यावेळी व्यक्त केली.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145