Published On : Fri, Nov 29th, 2019

माननीय मुख्यमंत्र्यांनी रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प आता विदर्भात आणावा – माजी आमदार डॉ. आशिष देशमुख

रत्नागिरीच्या नाणार येथील ३ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प विदर्भातील नागपूरच्या औद्योगिक वसाहतीत हलवा, अशी मागणी कॉंग्रेसचे युवा नेते व माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांचेकडे करीत त्यांना मुख्यमंत्री पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर पहिल्याच दिवशी (दि. २९ नोव्हेंबर २०१९ ला) भेटून यासंबंधी एक निवेदन दिले. २३ एप्रिल २०१८ ला उद्धवजी ठाकरे यांनी डॉ. आशिष देशमुख यांच्या मागणीनुसार हा प्रकल्प विदर्भात हलविण्यास सहमती दर्शविली होती, हे विशेष.

“रत्नागिरीच्या नाणार येथे प्रस्तावित रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पाला शिवसेनेचा व स्थानिक लोकांचा विरोध आहे. हा प्रकल्प विदर्भात आल्यास उद्योगधंद्यांना एक नवी गती मिळेल तसेच रोजगार निर्मितीला चालना मिळेल. विदर्भातील मागास जिल्ह्यांमध्ये नवे उद्योगधंदे येण्यास व विदर्भाचा विकास होण्यास पूरक वातावरण निर्माण होईल तसेच कृषी आधारित प्रकल्पांना नव्या संधी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यास मदत होईल. शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळेल. लगतच्या ५ राज्यांना या प्रकल्पामुळे फायदा होईल.

Advertisement

पानिपत, भटिंडा, दिल्ली, बिना, गोवाहाटी इत्यादी ठिकाणी इनलँड रिफायनरी प्रकल्प आहेत. या सर्व रिफायनरीज समुद्री बंदरांशी पाईपलाईनने जोडल्या आहेत. विदर्भातील रिफायनरीसुध्दा अशाप्रकारे मुंबई बंदराशी पाईपलाईनने जोडणे शक्य आहे. ही पाईपलाईन समृध्दी महामार्गाच्या बाजुला उभारता येईल. या तत्वावर आपल्या सहमतीने विदर्भात हा प्रकल्प सुरु करण्यात काहीच अडचण नाही. सिमेंटसाठी लागणारा पेटकोक, सिंथेटिक यार्न व डांबर निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल या प्रकल्पातून उपलब्ध होणार आहे.

पेट्रोल/डिझेल, एलपीजी गॅस व विमानाचे इंधन (एटीएफ) मुंबईहून रेल्वेद्वारे विदर्भात येते. याचा वाहतूक खर्च लिटरला चार रुपये पडतो. त्यामुळे विदर्भात या इंधनाच्या किंमती देशात सर्वाधिक आहेत. विदर्भात दरवर्षी १२ कोटी लिटर इंधने लागतात. विदर्भात रिफायनरी आली तर वाहतुकीवर होणारा ४८००० कोटी रुपयांचा खर्च वाचेल व ही इंधनेही स्वस्त होतील. हे स्वस्त पेट्रोल, डिझेल विदर्भानजीकच्या मध्य भारतातील 15 सिमेंट कारखान्यांना पुरवता येईल. याशिवाय नागपूर, जबलपूर व रायपूर हे तिन्ही विमानतळ या रिफायनरीशी पाईपलाईनद्वारे जोडता येतील व त्यांना स्वस्त एटीएफ पुरवता येईल.

त्यामुळे विमान वाहतुकीला बळ मिळेल. विदर्भातील या रिफायनरीतून बहुमोल पेट्रो-केमीकल्सही मिळतील व त्यावर पक्रिया करणारे उद्योग विदर्भात येतील व रोजगार उपलब्ध होतील. या रिफायनरीमुळे नागपूरच्या मिहान एसईझेड प्रकल्पाला नवी उर्जा मिळेल. वाहतूक खर्च खूपच कमी होईल.

सध्या भारतातील सर्व रिफायनरीजची क्षमता २४५ दशलक्ष टन आहे. २०३० पर्यत ही क्षमता ४३९ दशलक्ष टनापर्यंत वाढणार आहे. त्यामुळे नव्या रिफायनरीज उभ्या करणे क्रमप्राप्त आहे. त्यापैकी एक रिफायनरी सरकारने विकासाच्या दृष्टीने विदर्भात उभारणे गरजेचे आहे. ही रिफायनरी विदर्भात आली तर औद्योगिक प्रगती साधण्यासोबतच रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध होतील.

३ लाख कोटीच्या या प्रकल्पातून विदर्भातील ४० ते ४५ हजार युवकांना प्रत्यक्ष रोजगार व १ लाख युवकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. केंद्र व राज्य शासनस्तरावर पुढाकार घेऊन आपण विदर्भात हा प्रकल्प आणावा व रोजगार निर्मिती करावी तसेच वैदर्भीय युवकांचे भविष्य उज्ज्वल करावे, अशी विनंती मी आपणास या पत्राद्वारे करीत आहे.”, अशा आशयाचे एक महत्वपूर्ण पत्र डॉ. आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांना दिले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement