Published On : Mon, Aug 27th, 2018

पंढरपूर मंदिर समितीतर्फे केरळ पूरग्रस्तांसाठी २५ लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

Advertisement

मुंबई : केरळमधील पूरग्रस्तांना महाराष्ट्र शासनाकडून विविध प्रकारची मदत देणे सुरू आहे. राज्यातील जनतेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत द्यावी या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतर्फे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी आज २५ लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासनाने विविध पातळ्यांवर मदतीचा ओघ सुरू ठेवला आहे. राज्यातील जनताही आपल्या परीने मदत करत असून आता राज्यातील मंदिर समिती, ट्रस्ट, सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी आदींकडून मदत होत आहे.

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाकडून २५ हजार
केरळ पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेसकॉम) यांनी खारीचा वाटा उचलला आहे. महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी, उपाध्यक्ष ना.ना. इंगळे, अण्णासाहेब टेकाळे, अरुण रोडे यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांनी २५ हजारांचा धनादेश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे मंत्रालयात सुपूर्द केला. यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते.