Published On : Tue, Feb 4th, 2020

हिंगणघाट जळीतकांड; पीडितेवर विशेष उपचारासाठी ‘बर्न्स स्पेशालिस्ट’ डॉ. केसवानी नागपुरात

नागपूर : हिंगणघाट येथील जळीतकांडातील पीडितेवर विशेष उपचार करण्यासाठी नॅशनल बर्न्स सेंटरचे तज्ज्ञ डॉ. सुनील केसवानी आज मंगळवारी रात्री विशेष विमानाने नागपूरला पोहचले.

गंभीररीत्या भाजलेल्या रुग्णांवर उपचार करणारे ‘बर्न्स स्पेशालिस्ट’ म्हणून डॉ. सुनील केसवानी ओळखले जातात. गृहमंत्री अनिल देशमुख हे त्यांना आणि डॉक्टरांच्या चमूला मुंबईहून नागपूरला घेऊन आले आहेत.

नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये डॉ. केसवानी यांनी संबंधित महिला प्राध्यापिकेवर उपचार प्रारंभ केले आहेत. गरज भासल्यास पीडितेला मुंबईला हलविण्यात येईल, असे डॉ. सुनील केसवानी यांनी सांगितले. डॉ. सुनील केसवानी यांना प्लास्टिक सर्जरीच्या क्षेत्रातील ३० वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे, हे येथे उल्लेखनीय.