Published On : Thu, Jul 15th, 2021

महामार्ग पथकर नाक्यांवर सौर ऊर्जा वापर बंधनकारक करणार : ना. गडकरी

‘सीआयआय’च्या पदाधिकार्‍यांशी संवाद

नागपूर: नवीनीकरण सौर ऊर्जा निर्मितीला केंद्र शासनाचे प्रोत्साहन असून यापुढे राष्ट्रीय महामार्गांवरील सर्व पथकर नाक्यांवर सौर ऊर्जेचा वापर बंधनकारक करण्यात येणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

Advertisement

‘सीआयआय’च्या पदाधिकार्‍यांशी ‘सौर ऊर्जा निर्मितीत आत्मनिर्भरता’ या विषयावर ते आभासी कार्यक्रमातून संवाद साधत होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- या वर्षअखेरपर्यंत भारत 175 गीगा वॉट सौर ऊर्जा निर्मिती करण्यात यशस्वी ठरणार असून जगात भारत सौर ऊर्जा निर्मितीत सध्या 5 व्या क्रमांकावर आहे. सन 2030 पर्यंत भारत 450 गीगा वॉट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य पूर्ण करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Advertisement

सौर ऊर्जेच्या विस्ताराला प्रोत्साहन देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- सौर ऊर्जा क्षेत्रातही भारताने आत्मनिर्भर होण्यासाठी घरगुती सौर वीज निर्मिती (रुफ टॉप सोलर) प्रणालीचा अधिक विस्तार करणे गरजेचे आहे. देशाच्या नूतनीकरण सौर ऊर्जा क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र शासनाने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 1.4 ट्रिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. महामार्ग क्षेत्रात येत्या 2 वर्षात 15 लाख कोटींचे रस्ते बांधण्याचे आम्ही ठरवले आहे. प्रवासी आणि मालवाहतूक अधिक सुरक्षित आणि कमी वेळात व्हावी या उद्देशाने महामार्ग विस्ताराचे प्रकल्प सुरु करण्यात आले आहे. 8 हजार किमीचे 22 हरित राष्ट्रीय महामार्ग बनविले जात आहेत. याशिवाय 8500 किमीच्या महामार्ग बांधकामाचा समावेश नॅशनल लॉजिस्टिक मास्टर प्लॅनमध्ये करण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.

राजस्थान, हिमाचल, उत्तरप्रदेश आणि आंध्रप्रदेश या चार राज्यांमध्ये महामार्ग कॉरिडॉर उभारण्याच्या दृष्टीने भारत सरकार आणि जागतिक बँकेने 500 मिलियन डॉलरच्या एका करारावर नुकतीच स्वाक्षरी केली असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- पायाभूत सुविधांचा विकास करताना शाश्वत विकास, खर्चात परवडणारे, वेळेत पूर्ण होणारे आणि उत्तम दर्जा असलेले रस्ते, पूल, उड्डाणपूल आणि बोगदे बांधण्याकडे अधिक लक्ष देण्याचे राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने ठरविले आहे. तसेच जैविक इंधनाच्या वापरालाही शासन अधिक प्रोत्साहन देत आहे.

आठ लाख कोटींच्या क्रूडतेल आयातीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने जैविक इंधन वापरास शासनाचे प्रोत्साहन आहे. एवढेच नव्हे तर इले. वाहने चार्जिंगसाठीही सौर ऊर्जेचा वापर व्हावा, यालाही आम्ही प्रोत्साहन देत आहोत. आमच्या देशात मुबलक सौर ऊर्जा उपलब्ध होऊ शकते. सौर ऊर्जेवर वाहने चार्ज झाली तर इलेक्ट्रिक पेक्षा अत्यंत कमी खर्चात ती चार्ज होऊ शकतील आणि वातावरण प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी कार्बन उत्सर्जनही होणार नाही, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement