
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्याने नागपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी आपल्या निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचा संदर्भ देत, सुशिक्षित आणि उच्चभ्रू परिसराच्या तुलनेत गुन्हेगारी, अंडरवर्ल्ड आणि रेड-लाइट भागातून आपल्याला अधिक मतदान मिळाल्याचा दावा केला.
गडकरी यांच्या म्हणण्यानुसार, उच्चभ्रू आणि सुशिक्षित भागांमध्ये त्यांना सुमारे ७० ते ७५ टक्के मतदान झाले. मात्र, गुन्हेगारी आणि रेड-लाइट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात त्यांच्या बाजूने तब्बल ९२ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचे त्यांनी सांगितले.
मतदानाचा अर्थ वेगळा काढू नका-
या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ नये, यासाठी गडकरी यांनी लगेचच स्पष्टीकरण दिले. संबंधित भागातील व्यक्तींशी आपले कोणतेही वैयक्तिक संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कारवायांना आपला पाठिंबा नसल्याचेही त्यांनी सांगितले.
गडकरी यांनी म्हटले की, या परिसरांमध्ये त्यांनी विकासाची अनेक कामे केली आहेत. विशेषतः रस्ते, मूलभूत सुविधा आणि समाजोपयोगी कामांवर भर देण्यात आला. या कामांमुळे तेथील नागरिकांचा आपल्यावरील विश्वास वाढला आणि त्याचे परिणाम मतदानात दिसून आले, असे त्यांनी स्पष्ट केले.
गडकरींच्या वक्तव्यांची नेहमीच चर्चा-
नितीन गडकरी हे आपल्या थेट आणि स्पष्ट वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांची भाषणे अनेकदा राजकीय चर्चेचा विषय ठरतात. यापूर्वीही त्यांच्या एका वक्तव्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत चर्चा रंगली होती.
गडकरी यांनी एका कार्यक्रमात सार्वजनिक जीवनातील आपल्या तीन दशकांच्या प्रवासाचा उल्लेख करत नव्या पिढीला संधी देण्याची गरज व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांच्या राजकीय निवृत्तीच्या चर्चांना सुरुवात झाली.
मात्र, गडकरी यांच्या कार्यालयाकडून त्यानंतर स्पष्टीकरण देण्यात आले. त्यांचे वक्तव्य राजकारणातून निवृत्ती घेण्याबाबत नसून लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या संदर्भात असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
आता रेड-लाइट आणि गुन्हेगारी भागातील मतदानाबाबत केलेल्या ताज्या दाव्यामुळे गडकरी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.




