Advertisement
नागपूर : काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द ठरविले होते. यामुळे त्यांचा रामटेक लोकसभा निवडणुकीतील अर्ज रद्द करण्यात आला.
त्यामुळे त्या लोकसभा निवडणूक लढण्यास मुकल्या आहेत. याप्रकरणी बर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली.
गुरुवारी सकाळी उच्च न्यायालयाने रश्मी बर्वे यांना दिलासा देत जातवैधता समितीच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली आहे. मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असल्याने त्यात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला.
न्या. अविनाश घरोटे आणि न्या. मुकुलिका जवळकर यांच्या खंडपीठाने गुरुवारी या प्रकरणी अंतरिम आदेश दिला. न्यायालयाने सर्व प्रतिवादी यांना नोटीस बजावून २४ एप्रिल पर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेशही दिले.